पुणे :- पाच रुग्णांना नवीन जीवन! मृत्यूनंतर अवयवदान करणारा पहिला पत्रकार
पुण्यातील 'पोलिसनामा' या न्यूज पोर्टलचे वरिष्ठ वार्ताहर प्रसाद गजानन गोसावी यांचं रविवार 1 सप्टेंबर रोजी निधन झालं. पावणेदोन महिन्यांपूर्वी गंभीर अपघात झाल्यामुळे त्यांच्यावर निगडीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
पण त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. प्रसाद यांच्या कुटुंबियांच्या इच्छेनुसार मृत्यूनंतर त्यांचं अवयव दान करण्यात आलं. प्रसाद हे अवयवदान करणारे पहिले पत्रकार ठरले आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर काही तासातच त्याच्या हृदयाचे दुसऱ्या एका लष्करी जवानाच्या शरीरात यशस्वीपणे प्रत्यारोपण देखील करण्यात आलं. त्यामुळे प्रसादने मृत्युसोबत केलेली झुंज अपयशी ठरली असली तरीही आजही त्याचे हृदय धडधडते आहे.
हृदयाबरोबरच दोन फुफ्फुसे , यकृत, व एक मूत्रपिंड आणि दोन डोळे या अवयवांचेही दान करण्यात आलं. त्यामुळेपाच रुग्णांना नवीन जीवन मिळालं. प्रसाद गोसावी यांच्या दुचाकीला सव्वा महिन्यांपूर्वी ऑफिसमधून घरी येत असताना खडकी रेल्वे स्टेशनजवळ गंभीर अपघात झाला होता. त्याच्यावर निगडीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या अपघातात त्याच्या मेंदूला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांचा जीव वाचवण्याचं आव्हान डॉक्टरां पुढे होतं. उपचार सुरु असतानाच पायाच्या संवेदना नाहीशा झाल्यामुळे दुर्दैवाने त्याचा उजवा पाय पोटरीपासून काढण्याचा निर्णय घ्यावा लागला.
त्यानंतर त्याची प्रकृती सुधारत असतानाच अचानक मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याची शुद्ध हरपली. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण प्रसादच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. अखेर डॉक्टरांनी प्रसाद ब्रेनडेड झाल्याचं घोषित केले. या बातमीमुळे प्रसादच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. पण या परिस्थितीत डगमगून न जाता त्यांनी प्रसादचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. प्रसादचे डोळे, हृदय, दोन फुप्फुसे, यकृत, एक किडनी हे अवयव काढून घेण्यात आले.
प्रसादचे हृदय नेण्यासाठी पिंपरीपासून पुण्यापर्यंत ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. पोलीस आणि लष्करी जवानांच्या संरक्षणात त्याचे हृदय पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आले. त्यावेळी डी वाय पाटील रुग्णालयातील सर्व डॉक्टर व आणि कर्मचाऱ्यांनी प्रसादला सलामी दिली. इतकंच नाही तर त्याच्या मृत्यूनंतर काही तासातच त्याचे हृदय पुण्याच्या सदर्न कमांड हॉस्पिटलमध्ये नेण्यात येऊन त्या ठिकाणी एका जवानावर हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली.अवयवदानानंतर त्याचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. निगडीच्या स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आज प्रसाद या जगात नसला तरीही त्याचे हृदय अजूनही धडधडत आहे. भविष्यात एखाद्याला त्याच्या डोळ्यांनी हे जग पाहता येणार आहे. यकृत, फुप्फुसे आणि किडनी मिळाल्यामुळे रुग्णांना नवीन जीवन मिळालं आहे. आपल्या मृत्यूनंतर अवयवदान करणारा पहिला पत्रकार म्हणून प्रसाद गोसावी कायमस्वरूपी लक्षात राहतील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.