हुपरी :- पंक्चर दुकान बळकावण्याच्या हेतूने दोन लाखांची सुपारी देऊन मेस्त्रीचा खून
हुपरी : यळगूड येथील वाहनांचे पंक्चर काढणाऱ्या मेस्त्रीचा खून सुट्या पैशाच्या कारणातून नव्हे तर पंक्चर दुकान बळकावण्याचा हेतूने दोन लाख रुपयांची सुपारी देऊन झाल्याचा धक्कादायक प्रकार तपासात उघड झाला आहे.
हुपरी पोलिसांनी याप्रकरणी खुनाची सुपारी देणाऱ्या व घेणाऱ्या दोन मुख्य सूत्रधारांसह तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अजय दिलीप शिंगे (वय २३, रा. अंबिकानगर), तुषार ऊर्फ अनिकेत शामराव कांबळे (२४ रा. शाहूनगर, दोघेही हुपरी) व आर्यन दत्तात्रय घुणके (२२, रा. मानेनगर, रेंदाळ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. अन्य एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या खून प्रकरणात आतापर्यंत दोघा अल्पवयीन मुलांसह सहा जणांवर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. त्यापैकी चौघे अटकेत आहेत.
ही माहिती इचलकरंजी विभागाचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवी व पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : यळगूड येथे मेस्त्री गिरीश विश्वनाथ पिल्लाई (४७, रा. हुपरी, मूळ केरळ) यांचा गेल्या शनिवारी (ता. ३१) रात्री खून झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी संशयावरून दोघांना अटक केली होती. पंक्चर कामाचे पैसे देताना सुट्या पैशावरून वाद झाला आणि त्यातून खून केल्याची कबुली अटकेतील संशयित नचिकेत विनोद कांबळे याने प्राथमिक तपासात दिली होती.मात्र, मृत गिरीश व नचिकेत यांची पार्श्वभूमी पाहता या खुनामागे वेगळेच कारण असल्याची चर्चा लोकांमध्ये होती. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला होता. पोलिसांनी नचिकेतकडे कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने गुन्ह्यात अनिकेत कांबळेसह आणखी काही जणांचा सहभाग असल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी अजय शिंगेला ताब्यात घेतले. त्यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गिरीश यांच्या खुनाची सुपारी दिल्याची व ही सुपारी अनिकेत शामराव कांबळे याने दोन लाख रुपयांना घेतल्याचे सांगितले. त्यानुसार अनिकेत कांबळेसह आर्यन घुणके व एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी परिसरातून ताब्यात घेतले. त्यावेळी संगनमताने कट रचून गिरीश यांचा खून केल्याची कबुली संशयितांनी दिली, असे पोलिसांनी सांगितले.
दोन लाख रुपयांची सुपारी...!
संशयित अजय शिंगे व अनिकेत कांबळे यांच्यात दोन लाख रुपयांचा सौदा पक्का झाला. त्यानुसार आधी पन्नास हजार रुपये रोख देण्याचे व त्यानंतर दीड लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार संशयित अनिकेत कांबळे व त्याचे साथीदार शनिवारी (ता. ३१) रात्री चार चाकी व एका दुचाकीवरून गिरीश यांच्या पंक्चर दुकानात गेले. पंक्चर काढण्याचा बहाणा करत असताना मेस्त्री बेसावध स्थितीत असल्याचे पाहून संशयितांनी गिरीश यांच्या डोक्यात टॉमीचे प्रहार केले आणि त्या पाठोपकाठ पोटात चाकू खुपसून डाव साधल्याचे पोलिसांनी सांगितले.
दुकान बळकविण्यासाठी...
अजय शिंगे जवाहर साखर कारखाना परिसरात पंक्चर काढण्याचे काम करतो. गिरीश यांच्या पंक्चर दुकानावर त्याचा डोळा होता. हे दुकान बळकावण्यासाठी त्याने अनेकदा प्रयत्न केले होते. अशातच गिरीश दुकान विकून गावी जाण्याच्या तयारीत होते. त्यामुळे दुकान चालविण्यास घेण्याचा अजय याचा मनसुभा होता. त्यातून गिरीश यांच्याबरोबर त्याचा वाददेखील झाला होता; पण गिरीश दाद देत नव्हते. त्यामुळे अजयने गिरीश यांचा कायमचा काटा काढण्याचा डाव रचला. त्यानुसार त्याने तुषार ऊर्फ अनिकेत कांबळे याला खुनाची सुपारी दिली. संशयित अनिकेत कांबळे याच्यावर यापूर्वी विविध ठिकाणच्या पोलिस ठाण्यात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.