लाचेची ६० हजाराची रोकड शौचालयात टाकली, ५५ हजार जप्त
चलुचपत प्रतिबंधक ब्युरोच्या मुंबई युनिटने अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याला एका व्यक्तीकडून लाच मागितल्याच्या आरोपाखाली रंगेहाथ पकडले आहे. विशेष म्हणजे, लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर आरोपी लोकसेवकाला संशय आला, त्यानंतर त्याने घरी जाऊन लाचेची रक्कम (60000 रुपये) शौचालयात टाकली.
एसीबीच्या पथकाला इमारतीच्या ड्रेनेज चेंबरमधून 57000 रुपये जप्त करण्यात यश आले. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार एका खासगी कंपनीत संपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. बोरिवली पश्चिम येथील एका हॉटेल मालकाने पीएनजी कनेक्शनचे काम आणि त्यांच्या हॉटेलचे ना-हरकत प्रमाणपत्र तक्रारदाराला दिले होते. तक्रारदाराने सदर कामांसाठी बृहन्मुंबई अग्निशमन दलाच्या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज केला होता. त्यानंतर तक्रारदाराने अग्निशमन दलाचे वरिष्ठ केंद्र अधिकारी लोकसेवक प्रल्हाद शितोळे यांची त्यांच्या दहिसर कार्यालयात भेट घेतली.
त्यानंतर शितोळे यांनी तक्रारदाराने ज्या हॉटेलसाठी ऑनलाइन अर्ज केला होता त्या हॉटेलच्या जागेला भेट दिली होती. त्यावेळी शितोळे याने तक्रारदाराला पीएनजी कनेक्शन व ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी मोबाईलच्या कॅल्क्युलेटरवर 1.30 टाईप करून 1.30 लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने याबाबत वरिष्ठांना माहिती दिली असता, सदर रक्कम भरणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने दिनांक 28/08/2024 रोजी पुन्हा शितोळे यांची भेट घेतली असता त्यांनी पुन्हा मोबाईल कॅल्क्युलेटरवर 80 टाईप करून 80 हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने, 29/08/2024 रोजी त्यांनी ACB मुंबई कार्यालयात भेट देऊन लोकसेवकाविरुद्ध तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने, 29/08/2024 रोजी केलेल्या पडताळणी दरम्यान, शितोळे यांनी 80,000 रुपयांची मागणी केली होती आणि 60,000 रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती.त्यानुसार, 30/08/2024 रोजी सापळा रचत असताना शितोळे यांनी तक्रारदाराकडून कार्यालयातील लिफ्टमध्ये 60000 रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. मात्र शितोळे यांना संशय आल्याने त्यांनी त्याच इमारतीच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या घरी जाऊन लाचेची रक्कम नष्ट करण्याच्या उद्देशाने शौचालयातील लाचेची रक्कम टाकली मात्र, एसीबीच्या पथकाला लाचेची रक्कम इमारतीच्या ड्रेनेज चेंबरमधून सापडली, स्वीकारलेल्या रकमेपैकी 57,000 रुपये लाचेची रक्कम जप्त करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता एसीबी कोठडी सुनावण्यात आली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.