Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

२५ आमदार आणि ४ खासदार राजीनामा देणार, शरद पवारांच्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ!

२५ आमदार आणि ४ खासदार राजीनामा देणार, शरद पवारांच्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ!
 

आगामी विधानसभा निवडणूक जाहीर होण्यााआधीच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सहाव्यांदा उपोषणाला सुरुवात केली आहे.

तर दुसरीकडे पंढरपूरमध्ये आदिवासीतून आरक्षण द्या, या मागणीसाठी धनगर समाजातील नेते उपोषणाला बसले आहेत. यामुळे आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धनगर समाजाच्या मागणीनंतर आदिवासी आमदारांनी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. धनगर समाजाला आदिवासीमधून आरक्षण दिलं तर २५ आदिवासी आमदार आणि ४ खासदार राजीनामा देऊ, असा इशारा शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा यांनी दिला आहे. आमदार सुनील भुसारा यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, सुनील भुसारा यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. 'धनगर समाजाला आरक्षण देण्याला आमचा अजिबात विरोध नाही. पण आदिवासीमधून आरक्षण देऊ नका ही आमची भूमिका आहे. तुम्ही आदिवासीमधून आरक्षण दिलं तर सर्वपक्षीय २५ आदिवासी आमदार आणि ४ खासदार राजीनामा देऊ, मग रस्त्यावरची लढाई लढणार. आम्ही सोमवारी याबाबत बैठक घेऊन आमचा निर्णय होणार आहे, असा इशारा सुनील भुसारा यांनी दिला आहे.

केंद्र सरकारने एक देश एक निवडणूक प्रस्तावाला दिलेल्या मंजुरीवरही भुसारा यांनी भाष्य केलं. 'केंद्र सरकारने एक देश एक निवडणुकीचा प्रस्ताव आज स्वीकारला आहे. सरकारचा हा निर्णय मनमानी पद्धतीचा आहे. प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा घाट सरकार घालत आहे. यंत्रणा नाही, असं म्हणत महाराष्ट्राची निवडणूक हरियाणासोबत घेतली नाही, मग आता देशाच्या निवडणुका एकत्र कशा घेणार आहात? असा सवाल सुनील भुसारा यांनी उपस्थित केला आहे.

धनगर समाजाच्या मागणीवर नरहरी झिरवळ काय म्हणाले?

अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवळ म्हणाले की,'प्रत्येकाला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे. धनगर समाजाला देखील आरक्षण द्यावं, पण आमच्यातून नको ही आमची मागणी आहे. धनगर आणि धनगड वेगळे आहेत हे सुप्रीम कोर्टाने देखील सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाची बाजू ऐकली, तशी आमची देखील बाजू ते सोमवारी ऐकणार आहेत. सरकार आदिवासीमधून आरक्षण देईल, असं वाटत नाही'.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.