दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर अथर्वशीर्ष पठणाचा वर्ल्ड रिकॉर्ड; स्त्री शक्तीचा जागर
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत. यंदाही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर महिलांचं सामूहिक अथर्वशीर्ष पठण झालं आहे. हजारो महिलांनी एकाच वेळी अथर्वशीर्ष पठण केलं आहे. वर्ल्ड रिकॉर्डमध्ये अथर्वशीर्ष पठनाची नोंद झाली आहे. यावर्षी महिलांची संख्या वाढल्याचं पाहायला मिळालं.
टाळांच्या गजरात महिलांनी मोरया मोरयाचा गजर केलाय. दरवर्षी गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर ऋषिपंचमीला बाप्पा समोर हजारो महिला पहाटे सामूहिक अथर्वशीर्ष पठण करत असतात. ती पंरपरा यंदाही कायम राहिली आहे. मोठ्या प्रमाणात महिला याठिकाणी जमा झाल्या होत्या. या संदर्भातील काही व्हिडिओ समोर आले आहेत.ओम नमस्ते गणपतये... ओम गं गणपतये नमः:... मोरया, मोरया... च्या जयघोषाने तब्बल ३५ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक यानिमित्ताने पहायला मिळाला. पारंपरिक वेशात मध्यरात्री १ वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरीता हजेरी लावण्यास सुरुवात केली. गणेश नामाचा जयघोष करीत अथर्वशीर्षासोबत महाआरती करीत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला.
निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवाच्या १३२ व्या वर्षी उत्सव मंडपासमोर आयोजित अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे, वृषाली श्रीकांत शिंदे, यांसह शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव, प्रा.गौरी कुलकर्णी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी शंखनाद केल्यानंतर सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर मन शांत करणारा ओंकार जप, गणेश जागर गीत आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. महिला हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत गणरायाला नमन करीत होत्या. गणेश नामाचा गजर करताना प्रत्येक महिलेच्या चेह-यावरील उत्साह ओसंडून वाहत होता. महिला अथर्वशीर्ष पठण उपक्रमाची दखल इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड ने घेत डॉ. दीपक हरके यांनी ट्रस्टला प्रमाणपत्र दिले.
दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाडयापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरीता गर्दी केली. भक्तीरसात तल्लीन झालेल्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता आरतीने झाली. पुण्यासह मुंबई, लातूर, कोल्हापूर, नाशिक व महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून आलेल्या महिलांनी उपक्रमात सहभाग घेतला. उपक्रमाचे ३९ वे वर्ष होते.डॉ.अरुणा ढेरे म्हणाल्या, बुद्धी हीच खरी शक्ती आहे. सर्व महिला आज गणरायाकडे बुद्धी मागायला मोठ्या संख्येने आल्याचे चित्र प्रेरणादायी आहे. प्रत्येक कार्यामागे बुद्धी आहे, एक विचार असतो. जे काही करतो, ते आपण बुद्धीपूर्वक करायला हवे. आज बाहेरील परिस्थिती बदलत चालली आहे. त्यामुळे महिलांनी आपली शक्ती जागृत करायला हवी, असेही त्यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.