अमरावती : कार व दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आठ आरोपींनी सुवर्णकार वडील व मुलाला मारहाण करून त्यांच्याजवळील २५ किलो चांदी असलेली बॅग हिसकावून पळ काढला. त्यांनी आरोपींचा प्रतिकार केला असता झटापटीदरम्यान सुवर्णकाराने सोने व रोकड असलेली बॅग परिसरातील एका घरात फेकल्याने तो ऐवज बचावला. या घटनेतील चार आरोपींकडे देशी कट्टे होते, असा दावा फिर्यादीने केला. याप्रकरणी, गाडगेनगर पोलिसांनी आठ अज्ञातांविरूद्ध सायंकाळी ५.२५ वाजता सशस्त्र दरोड्याचा गुन्हा दाखल केला.
बुधवारी सकाळी ११:२५ वाजताच्या सुमारास जवाहरनगर येथील मातामाय मंदिराजवळ ही घटना घडली. घटनेचे गांभीर्य ओळखून उच्च पदस्थ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. दरोडेखोरांनी लुटलेल्या चांदीचे बाजारमूल्य सुमारे २० लाखांच्या घरात आहे. जवाहरनगर येथील रहिवासी अरविंद उत्तमराव जावरे (४८) यांचे नवसारी ते व्हीएमव्ही मार्गावर सराफा दुकान आहे. बुधवारी सकाळी ११:०० वाजताच्या सुमारास अरविंद हे वडील उत्तमराव जावरे (७५) यांच्यासह दुचाकीने दुकानात जात होते. त्यांच्याकडील एका बॅगमध्ये सोने व रोख रक्कम, तर दुसऱ्या बॅगमध्ये चांदी होती. जावरे पिता-पुत्र घरापासून काही अंतरावर पोहोचताच एका मंदिराजवळ एका लुटारूने अचानक अरविंद यांच्या दुचाकीला लाथ मारली. त्यामुळे ते दोघेही पडले. त्याचवेळी दुसऱ्या एका तरूणाने २५ किलो चांदीचे दागिणे असलेली बॅग दुचाकीवरून उचलली.
यावेळी त्यांच्यात चांगलीच झटापट झाली. ती बॅग त्या आरोपीने जवळच्या चारचाकीतील इसमाकडे दिली. त्याचवेळी तिसऱ्या आरोपीने त्यांच्याकडील सोने व रोकड असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. अन्य तीन मुलांनी जावरकर यांना मारहाण केली. मात्र, त्यांनी ती बॅग परिसरातील एका नागरिकाच्या घरात फेकली. चारपैकी एकाने आपल्या नाकावर देशीकट्टयाने मुठीकडून मारले. त्यामुळे आपले नाक फुटले. लगेच ज्या तीन मुलांच्या हाती देशी कट्टे होते ते व अन्य एक मुलगा असे चौघेही दुचाकीने पळाले, तर कारमध्ये देखील चौघे होते, असे अरविंद जावरे यांनी म्हटले आहे.
व्हिडीओ बनविणाऱ्या महिलेला धमकावले!
भरदिवसा झालेली लूटमारीची घटना या परिसरातील एक महिला आपल्या घराच्या वरच्या माळ्यावरून मोबाइलमध्ये कैद करीत होती. हा प्रकार आरोपींच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्या महिलेला पिस्टलचा धाक दाखवून धमकावले. त्यामुळे घाबरलेली महिला जिवाच्या भीतीने घरात निघून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.
प्रत्यक्षदर्शीनी दिली माहिती
गाडगेनगरचे ठाणेदार प्रशांत माने यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले. पोलिस उपायुक्त सागर पाटील, एसीपी शिवाजीराव बचाटे, गुन्हे शाखेच्या निरीक्षक सीमा दाताळकर यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. फॉरेन्सिकची चमू, ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. याप्रकरणी अरविंद जावरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आठ जणांविरुद्ध दरोडा व आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला.
आरोपींनी केली रेकी
जवाहरनगरात शिरलेले आठ आरोपी सुवर्णकार अरविंद जावरे यांच्यावर पाळत ठेवून होते. ते बराच वेळ परिसरातील एका मंदिराजवळ फिरत होते. अरविंद व त्यांचे वडील उत्तमराव हे एकाच दुचाकीने परिसरातील मंदिराजवळ पोहोचताच आरोपींनी अचानक त्यांना लाथ मारून खाली पाडले. त्यानंतर लुटारूंनी हाती आलेली चांदीची बॅग घेऊन तेथून पळ काढला, असे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.