"माशांच्या तेलाची किंमत."; तिरुपती बालाजी मंदिरातील लाडूसाठी तूप पुरवणाऱ्या कंपनीकडून स्पष्टीकरण!
अंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूंसाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात माशांचा तेलाचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर मोठी खळबळ उडाली आहे. यावरून आंध्र प्रदेशमध्ये
राजकारणही तापलं आहे. दरम्यान, या आरोपांवर आता लाडूसाठी तूप पुरवणाऱ्या
कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
"आमच्यावरील आरोप हास्यास्पद"
‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, राज्य सरकारने कायदेशीर कारवाई सुरू केल्याच्या एक दिवसानंतर कंपनीने या आरोपांचे खंडन केलं आहे. यासंदर्भात कंपनीच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाचे प्रमुख कानन यांनी शुक्रवारी एका तामिळ वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. "खरं तर आमच्या कंपनीवर झालेले आरोप चुकीचे आहे. कारण माशांचे तेल तुपापेक्षा महाग आहे. तसेच अशी कोणतीही भेसळ जर तुपात केली, तर नुसत्या वासावरून ती ओळखता येऊ शकते, त्यामुळे हे आरोप हास्यास्पद आहे", असे ते म्हणाले.
"नॅशनल लॅबमध्ये आमच्या तुपाचे नमुने पाठवण्यात आले होते"
पुढे बोलताना, "ज्यावेळी आम्हाला तिरुपती बालाजी देवस्थानासाठी तूप पुरवण्याचे कंत्राट मिळालं, त्यावेळी देवस्थानातील चार तज्ज्ञांच्या टीमने आमच्या कंपनीला भेट दिली होती. त्यावेळी गुणवत्ता तपासूनच त्यांनी आम्हाला कंत्राट दिलं होतं. याशिवाय नॅशनल लॅबमध्येही आमच्या तुपाचे नमुने पाठवण्यात आले होते", असेही त्यांनी सांगितले.
"तूप पुरवणं हा आमच्यासाठी व्यवसाय नाही, तर श्रद्धेचा विषय"
"आम्ही १९९८ पासून या व्यवसायात आहोत. मात्र, अशाप्रकारचे आरोप पहिल्यांदाच आमच्यावर करण्यात आले आहेत. हे दुर्देवी आहे. आमच्याकडे जेव्हा दूध येते, तेव्हा त्याची योग्य ती चाचणी केली जाते. या चाचणीत जर दुध योग्य नाही, असं आढळून आलं, तर ते तात्काळ परत पाठवल्या जाते", अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच "तिरुपती बालाजी देवस्थानाच्या प्रसादासाठी तूप पुरवणं हा आमच्यासाठी केवळ व्यवसाय नाही, तर श्रद्धेचा विषय आहे", असेही ते म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.