Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुणे :- पोर्शे प्रकरणात आमदार सुनील टिंगरेंचा संबंध, पुणे पोलीस आयुक्तांची माहिती

पुणे :- पोर्शे प्रकरणात आमदार सुनील टिंगरेंचा संबंध, पुणे पोलीस आयुक्तांची माहिती
 

पुण्यात कल्याणी नगरमधील पोर्शे कार अपघात प्रकरणात  पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांची काही दिवसांपूर्वी चौकशी केली होती. या प्रकरणात आमदार टिंगरे यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे समोर आले आहे.

पोलीस ठाणे स्तरावर आणि ससूनमधील प्रक्रियेदरम्यान आमदार टिंगरे  यांचा हस्तक्षेप झाल्याचा आरोप केला जात होता. याविषयी शुक्रवारी (दि. ६) पोलीस आयुक्त अमितेश कुमार  यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट केले. अगरवालला मदत करण्यासाठी अनेकांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे मदत केली असून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त म्हणाले. याप्रकरणी 'सीविक मिरर'ने आमदार टिंगरे यांना संपर्क साधला असता त्यांनी यावर बोलायचे टाळले.

अपघात घडल्यानंतर टिंगरे हे स्वत: पोलीस ठाण्यात हजर होते. यासोबतच त्यांचे आणि अगरवाल कुटुंबाचे पारिवारिक संबंध असल्याचे समोर आले होते. टिंगरे यांनी कारवाईवर दबाव आणल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला होता. त्यावेळी टिंगरे यांचे निकटवर्तीय अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड हेदेखील आरोपीच्या बाजूने सक्रिय असल्याचे तपासात समोर आले आहे.

बेदरकारपणे वेगवान गाडी चालवून दोघांचे जीव घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीला वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात आणण्यात आले होते. तेव्हा एका गाडीमधून आरोपीचा आजोबा सुरेन्द्र अगरवाल आणि त्याची आई शिवानी अगरवाल ससूनमध्ये आले होते, तर दुसऱ्या गाडीमधून मकानदार आणि गायकवाड हे दोघे आले होते. या दोघांनीच अतुल घटकांबळेकडे रक्तनमुने बदलण्याकरिता तीन लाख रुपये दिले होते. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील टिंगरे यांची चौकशी झाल्याची माहिती माध्यमांना दिली होती. टिंगरे यांच्या चौकशीचा अहवाल गुप्त राखण्यात आला आहे.
 
कल्याणीनगरमध्ये १९ मे रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास भरधाव पोर्शे कारची धडक बसल्यामुळे अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा या दोन आयटी अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आतापर्यंत तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिला गुन्हा १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामधील पुराव्यांमध्ये छेडछाड झाल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणात काही कलमांची वाढ करण्यात आली. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विशाल अगरवाल, ससूनचा फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, सीएमओ डॉ. श्रीहरी हाळनोर, अतुल घटकांबळे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवाल हिलादेखील अटक करण्यात आली. या मुलाच्या वैद्यकीय तपासणीदरम्यान त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. त्या जागी शिवानी अगरवालचे नमुने घेण्यात आले होते. डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर यांच्या प्रकरणात भ्रष्टाचार अधिनियम, मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस तपास योग्य पद्धतीनेच : अमितेश कुमार
कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने केला आहे. पोलिसांची कार्यपद्धती, तपास याबाबत काहींनी शंका उपस्थित केली. समाज माध्यमात टीका झाली. मात्र, पोलिसांनी तपासात हलगर्जी केलेली नाही. दोषी असलेल्या प्रत्येकावर कारवाई केली आहे. अपघातानंतर आमदार सुनील टिंगरे येरवडा पोलीस ठाण्यात गेले होते. त्यांचीही चौकशी झाली. त्यांनी पोलिसांवर दबाब आणला का नाही, हे आताच सांगणे योग्य होणार नाही. मात्र, त्यांचा अपघात प्रकरणाशी संबंध असल्याचे चौकशीत उघड झाले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. सर्व शक्यता गृहित धरून तपास केला आहे. तांत्रिक तपासावर लक्ष केंद्रित केले. परिस्थितीजन्य व तांत्रिक पुरावे गोळा केले. साडेतीन महिन्यांनंतरदेखील आरोपींना जामीन झालेला नाही. यावरून पोलिसांनी तपास योग्यरित्या केल्याचे सिद्ध झाले आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आवर्जून नमूद केले. 

अपघातानंतर आमदार सुनील टिंगरे येरवडा पोलीस ठाण्यात गेले होते. त्यांची चौकशी झाली. त्यांनी पोलिसांवर दबाव आणला की नाही, हे आताच सांगणे योग्य होणार नाही. मात्र, त्यांचा अपघात प्रकरणाशी संबंध असल्याचे चौकशीत उघड झाले आहे.
 
- अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.