ATM मधून 1000 काढले, निघाले 1600; प्रत्येक व्यवहारावर 600 रुपये अधिक...ग्राहकांची गर्दी
एटीएममधून (ATM) रक्कम काढताना प्रत्येकवेळी सहाशे रुपये अधिक निघत असल्याचे दिसून आल्याने ग्राहकांनी आपआपले डेबिट कार्ड घेऊन रक्कम काढल्याचे उघडकीस आले आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्याअंतर्गत खापरखेडा येथे Axis बँकेच्या एटीएमवर हा प्रकार घडला आहे.
एक हजार रुपये काढल्यास पाचशे रुपयांच्या दोन नोटा आणि दोनशे रुपयांच्या तीन नोटा निघत होत्या किंवा पाचशेच्या तीन आणि शंभराची एक नोट येत होती. एका जागरूक नागरिकाने पोलिसांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिल्यावर त्यांनी सदर एटीएम बंद केले. मात्र तोपर्यंत सुमारे तीन लाखांचा फटका बसला असावा असे बँकेच्या सूत्रांचे म्हणणे आहे. एका व्यक्तीला हजार रुपये काढल्यावर सोळाशे रुपये निघाल्याचे निदर्शनास आल्यानंतर कित्येक लोकांनी एकापेक्षा जास्त एटीएम कार्ड घेऊन या एटीएमवर गर्दी केली.
ज्यांची रक्कम काढण्याची मर्यादा संपली त्यांनी रात्री बारा नंतर पुन्हा नशीब आजमावले. ज्यांचे खाते रिकामे झाले त्यांनी आपल्या खात्यात ऑनलाईन रक्कम भरून पुन्हा पैसे काढले. एटीएममध्ये वेगवेगळ्या ट्रेची जागा बदलल्यास किंवा त्यात वेगळ्या नोटा ठेवल्यास असे घडले असल्याचे बँकेच्या सूत्रांनी सांगितले. गुरुवारी उशिरापर्यंत या एटीएममधील बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.