29 वर्षांनी दाऊदचं भूत पुन्हा मानगुटीवर? शरद पवारांयां च्यावर आरोपांनी खळबळ
लातूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर असे आरोप केले आहेत. शरद पवार यांचे दाऊदशी संबंध असल्याचे त्यांनी म्हटलंय. एका कार्यक्रमात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ''मी दिल्लीत होतो,
सगळे पत्रकार बसले होते. आमच्याकडे रिपोर्ट आले दंगल आहे. ते म्हणत होते
थांबवली पाहिजे. मी म्हणालो फोन करा शरद पवारांना तुमचे मित्र आहेत. थोर
नेते आहेत. जाणकार नेते आहेत पण दाऊदचे मित्रही आहेत.'' अशी परिस्थिती आहे
असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.
शरद पवारांवर याआधीही दाऊदशी संबंध असल्याचे आरोप
मुंबईवर १९९३ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आधी १९९२ मध्ये मंत्रिमंडळातील काही व्यक्ती आणि शरद पवार यांच्या निकटवर्तीयांनी दुबईत वारंवार संपर्क केल्याचा आरोप करण्यात आला होता. भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी तेव्हा आरोप केले होते. पण हे आरोप पुराव्याअभावी सिद्ध होऊ शकले नव्हते.
रॉच्या माजी अधिकाऱ्यानेही केले होते दावे
माजी रॉ अधिकारी एनके सूद यांनी एका मुलाखतीत शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांचे संबंध असल्याचे म्हटलं होतं. मुंबई बॉम्बस्फोटाचे आरोपी देशातून पळाले तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते. दाऊद आणि त्याच्या साथीदारांविरोधात कठोर पावले उचलली नाहीत. यातून शरद पवार आणि दाऊद यांचे संबंध असल्याचेच संकेत मिळतात असा दावा एनके सूद यांनी केला होता. २०१९ मध्ये ही मुलाखत एनके सूद यांनी दिली होती.
प्रकाश आंबेडकरांचा फडणवीसांवर निशाणा
देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी महाराजांच्या सुरतेच्या स्वारीबाबत केलेल्या वक्तव्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी निशाणा साधला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ''शिवाजी महाराजांची स्वारी गुजरातवर कधी झालीच नाही'' असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय. यापूर्वी आरएसएस असे म्हणत होते की शिवाजी महाराजांचा इतिहासच नाही. त्यामुळे एका कर्तबगार व्यक्तिमत्वाचा इतिहास नाकारण्याचा हा विषय होत असून याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी असे मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. ते माफी मागणार नाहीत याची मला खात्री असल्याचे देखील यावेळी आंबेडकर म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.