कोचिंग सेंटरला जायला घराबाहेर पडला तरुण, 166 कोटी रुपये मिळाले; पण कसे? पाहून अधिकारीही थक्क
जयपूर : आपल्याकडे भरपूर पैसा असावा असं कुणाला वाटत नाही. पण यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. कुणी लगेच श्रीमंत होत नाही. सगळ्यांचीच लॉटरी लागते असं पण नाही. पण एक तरुण जो कोचिंग सेंटर मध्ये शिकण्यासाठी जायचा त्याने वर्षभरात तब्बल 166 कोटी रुपये कमावले.
त्याची कमाईची पद्धत पाहून अधिकारीही थक्क झाले. राजस्थानमधील बारमेर येथील मुर्तला गाला गावातील 26 वर्षीय वीरेंद्र उर्फ कल्पेश कुमार. त्याने कृष्ण कुमार आणि दिनेश कुमार या दोन साथीदारांमार्फत मोठी फसवणूक केली. पुण्यातील जीएसटी गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने वीरेंद्र उर्फ कल्पेश कुमार आणि दिनेश कुमारला बारमेर येथून अटक केली आहे. तिसरा आरोपी कृष्ण कुमार याचा शोध सुरू आहे.
नेमकं प्रकरण काय?
डीजीजीआय बनावट कंपन्यांविरोधात मोहीम राबवत आहे. DGGI च्या तपासात असं आढळून आले की तीन कंपन्या पुण्यात कार्यरत आहेत, परंतु त्यांच्या व्यवसायाचा मूळ पत्ता गोवा आणि महाराष्ट्रातील अन्य काही ठिकाणी आहे. जेव्हा DGGI टीम मेसर्स एसके एंटरप्रायझेस, मेसर्स आरके एंटरप्रायझेस आणि मेसर्स श्री महालक्ष्मी एंटरप्रायझेसच्या पत्त्यांवर पोहोचली तेव्हा कंपनीचं कोणतंही कार्यालय आढळलं नाही. तिन्ही फर्म केवळ कागदावरच, अशा स्थितीत तपास यंत्रणा सतर्क झाली.
तपासादरम्यान, डीजीजीआयच्या पुणे पथकाला सुमारे 54 बनावट आणि बंद कंपन्यांच्या नावावर कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचं समोर दिसलं. इंटरनेट प्रोटोकॉल डेटा रेकॉर्डवरून असं दिसून आलं की मेसर्स एसके एंटरप्रायझेस आणि मेसर्स आरके एंटरप्रायझेस समान आयपी पत्ते वापरत आहेत. म्हणजेच एकाच कॉम्प्युटरचा वापर करून दोन्ही कंपन्या बनावट बिल बनवत आहेत.
कंपन्यांच्या ताळेबंदातून आणखी धक्कादायक खुलासे
एसके एंटरप्रायझेसचा मालक वीरेंद्र कुमार याने कंपनी उघडण्यासाठी कल्पेश कुमार नावाच्या व्यक्तीचं आधार कार्ड दिलं. मात्र, त्यावर वीरेंद्रचा फोटो चिकटवला होता. कल्पेश कुमारचं नाव कंपनीचा मालक म्हणून दिलेल्या आधारकार्डमध्ये लिहिलेलं होतं, तर त्याचा धारक वीरेंद्र कुमार आहे. रेकॉर्डमधील मोबाईल क्रमांक हे राजस्थानचे असल्याचे निष्पन्न झालं, परंतु तेही फसवणुकीने मिळवले गेले.पुण्यातील पथकाने वीरेंद्र उर्फ कल्पेश कुमारला 13 सप्टेंबर रोजी जयपूर येथून अटक केली. वीरेंद्र कुमारच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या खाते क्रमांकावरून देशभरातील व्यवहार झाल्याचं तपासात समोर आलं आहे. अशा स्थितीत तो मुख्य आरोपी मानला जात आहे.
166 कोटी रुपयांचा घोटाळा
महाराष्ट्रात बनावट कागदपत्रांच्या आधारे तीन कंपन्या स्थापन करून 166 कोटी रुपयांचा जीएसटी कराचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या तीन बनावट कंपन्यांच्या माध्यमातून 54 कंपन्यांची बनावट व्यापार बिले तयार करून 927 कोटी रुपयांचे व्यवहार दाखवून अवघ्या एक ते दीड वर्षात 166 कोटी रुपयांचा कर चुकवला. इनपुट टॅक्स क्रेडिट आणि जीएसटी रिफंडच्या नावाखाली करचोरी करण्यात आली. या संपूर्ण गेमचा मास्टरमाइंड वीरेंद्र उर्फ कल्पेश कुमार.
मुलाला अडकवलं जात असल्याचा वडिलांचा आरोप
इकडे आरोपी वीरेंद्र कुमारचे वडील हेमाराम यांनी आपल्या मुलाला यात अडकवलं जात असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, त्यांचा मुलगा जयपूरमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. मी बँकेकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर घेतला आहे आणि त्याचे हप्ते भरण्यासाठी ट्रॅक्टर चालवतो. मी दर महिन्याला माझ्या मुलाला खर्च देतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.