दिल्ली : जर तुमच्या मुलांनाही फुग्यासोबत खेळण्याची सवय असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एका छोट्याशा फुग्यानं 13 वर्षांच्या मुलाचा जीव घेतला आहे. दोन दिवस मुलगा रुग्णालयात भरती होता. त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र
शेवटी त्याला मृत्यूनं गाठलंच. ही घटना हिमाचल प्रदेशातल्या कांगडा
जिल्ह्यातील आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कांगडा जिल्ह्यातल्या
ज्वालीमधील ही घटना आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, विवेक कुमार असं या तेरा वर्षांच्या मुलाचं नाव आहे, तो सिद्धपूरघाडच्या सरकारी शाळेत शिकत होता. गुरुवारी शाळा सुटल्यानंतर विवेक हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाला. शाळेच्या प्रवेशद्वारावरच तो त्याच्याकडे असलेला फुगा फुगवायला लागला. मात्र त्याचवेळी अचानक फुग्यामधील हवा गेली आणि फुगा विवेकच्या तोंडात गेला, तो गळ्यात आडकला. या घटनेची माहिती त्याच्या शिक्षकांना मिळताच त्यांनी त्याला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी विवेकच्या गळ्यातून तो फुगा काढला. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक होती.
दोन दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र अखेर त्याचा मृत्यू झाला. विवेक हा एका गरिब कुटुंबातील मुलगा होता. विवेकच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विवेकचे वडील मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. विवेकला एक मोठी बहीण देखील आहे, ती बारावीमध्ये शिकत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.