हृदयद्रावक! रक्षाबंधनाला माहेरी आली अन् अंधारात नको ते घडलं.
जामनेर (जळगाव) : रक्षाबंधनसाठी माहेरी आलेल्या एका विवाहित महिलेला रात्रीच्या वेळी घरामध्ये सर्पदंश झाला. या घटनेमुळे महिलेचा मृत्यू झाला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जामनेर तालुक्यातील पिंपळगाव कमानी येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे.
जामनेर तालुक्यातील गोंदेगाव तांडा येथील पुजा काशिनाथ पवार (वय २१) असे मृत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. गोंदेगाव येथे पती, २ वर्षांच्या मुलासह त्या वास्तव्यास होत्या. रक्षाबंधनाच्या सणासाठी त्या तीन दिवस अगोदरच पिंपळगाव कमानी येथे आई-वडिलांकडे माहेरी आल्या होत्या. १६ ऑगस्टला रात्रीच्या सुमारास सर्वजण घरात असताना पूजा पवार यांना हाताला सर्पदंश झाला. काहीतरी चावल्याचे पूजा यांच्या लक्षात आले.
हातावरील दंशाची निशाणी पाहून सापाने दंश केल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने पूजा पवार यांना पहूर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी तपासून पूजा यांना मृत घोषीत केले. दरम्यान, तीन वर्षांपुर्वीच पूजाचे लग्न झाले होते. पूजा यांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पहूर पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.