राज्यात महायुतीची सत्ता जाणार? मविआला सर्वाधिक जागा, इंडिया टुडेचा सत्ताधाऱ्यांचा झोप उडवणारा सर्व्हे
अवघ्या काही महिन्यांवर आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. दरम्यान, राज्यामध्ये आज घडीला विधानसभा निवडणुकाझाल्या तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील?
कुणाचं सरकार सत्तेत येणार? याचा अंदाज इंडिया टुडे-सी व्होटर्सचा ‘मूड ऑफ नेशन’ सर्व्हेमध्ये समोर आला आहे. या सर्व्हेत महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेनं कौल दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अलीकडेच (दि. 16 ऑगस्टला) हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका जाहीर केल्या. तर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका दिवाळीनंतर होतील असे संकेत आयोगाने दिले आहेत.
मविआला 150 ते 160 जागा मिळणार
दरम्यान, आता इंडिया टुडे-सी व्होटर्सच्या ‘मूड ऑफ नेशन’ सर्वेनुसार महाविकास आघाडी 150 ते 160 जागा जिंकू शकते. तर महायुती 120 ते 130 जागा जिंकू शकते, असा अंदाज आहे. मतांची टक्केवारी पाहता महायुतीला 42 टक्के तर महाविकास आघाडीला 44 टक्के मते मिळतील असा अंदाज आहे.
सीएम शिंदेंना 3.1 टक्के लोकांची पसंती
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 43.71 टक्के, तर महायुतीला 43.55 टक्के मते मिळाली. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळेल, असा या सर्व्हेचा अंदाज आहे. शिवाय मविआला 150 ते 160 जागा मिळाल्या तर महाराष्ट्रात मविआची सत्ता येऊ शकते. याशिवाय या सर्व्हेमध्ये केवळ 3.1 टक्के लोकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पसंती दर्शवली आहे.
टाइम्स-MATRIZE सर्व्हे काय सांगतो?
काहीच दिवसांपूर्वी टाइम्स-MATRIZE चा सर्व्हे प्रकाशित झाला. त्यानुसार महाराष्ट्रात महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपला 95 ते 105 जागा मिळू शकतात. सीएम शिंदेंच्या शिवसेनेला 19 ते 24 जागा मिळण्याची शक्यता आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 7 ते 12 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली आहे. तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उबाठाला 26 ते 31 जागा मिळू शकतात. काँग्रेसला 42 ते 47 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 23 ते 28 जागा मिळण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.