बदलापूर पूर्व इथल्या एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावरून टीकेची झोड उठली आहे. याविरोधात आज (मंगळवार) सकाळपासून शाळेच्या गेटवर पालकांचं आंदोलन सुरू आहे. तर बदलापूर स्थानकावरही रेल रोको करण्यात आला आहे. शाळेने मुख्याध्यापिकेसह चौघांना निलंबित केलं आहे. नागरिकांनी मंगळवारी शाळेविरुद्ध आंदोलनाचा निर्णय घेतला असताना आदल्या दिवशी शाळेने माफीनामा सादर केला. आरोपी कर्मचाऱ्याची हकालपट्टी करण्यात आली असून त्याची भरती करणाऱ्या कंत्राटदार कायमस्वरुपी काळ्या यादीत टाकण्यात आल्याचंही शाळेनं स्पष्ट केलंय.
हा प्रकार ज्या ठिकाणी घडला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या मुख्याध्यापिका, वर्गशिक्षिका, मुलांची ने-आण करण्याची जबाबदारी असणाऱ्या दोन सेविकांना निलंबित करण्यात आलं आहे. पालकांच्या तक्रारीची वेळीच दखल न घेतल्याचा आरोप बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांच्यावर होत होता. त्यानंतर शितोळे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. आज सकाळपासूनच संतप्त पालकांनी शाळेच्या गेटवर ठिय्या आंदोलन केलंय. याठिकाणी मोठ्या संख्येनं पालक जमले होते. 'साहेब.. आम्हाला एक वेळ लाडकी बहीण योजना नसली तरी चालेल पण सुरक्षित बहीण योजना पाहिजे', असा मजकूर लिहिलेल्या फलकाने सर्वांचं लक्ष वेधलं. बदलापूर रेल्वे स्थानकावरही रेल रोको आंदोलन करण्यात आल्याने कल्याण-कर्जतदरम्यानची रेल्वे सेवा तासाभरापासून ठप्प झाली आहे. अनेक आंदोलक रेल्वे रुळावर उतरले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.