'लाडक्या बहिणींनो, पैसे घ्या पण या भुरट्यांना..', अभिनेत्याचा सल्ला; म्हणाला, 'ठेचायची तर..'
लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट), भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सुरु केली.
मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीमध्ये 'मुख्यमंत्री लाडली बेहना योजना' डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्रातही अशीच योजना राबवण्यात आली. मध्य प्रदेशमध्ये प्रत्येक महिलेला दर महिना 1200 रुपये या योजनेअंतर्गत देण्यात आले. महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी पात्र ठरलेल्या प्रत्येक महिलेला 1500 रुपये देण्याचं निश्चित केलं. विशेष म्हणजे या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून सरकारच्या दाव्यानुसार 2 कोटींहून अधिक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये 35 हजार कोटींची विशेष तरतूद या योजनेसाठी करण्यात आली आहे. या योजनेचा जोरदार प्रचार सध्या सुरु आहे. असं असतानाच एका अभिनेत्याने या योजनेबद्दल केलेला एक दावा चर्चेचा विषय ठरतोय.
पैसे तुमचेच ते नक्की घ्या...
याच वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेल्या या अभिनेत्याने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना सल्ला देताना सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा नक्की लाभ घ्या, असं सांगितलं आहे. तसेच सरकार बहिणींना देत असलेला पैसा हा तुमचाच असल्याचंही अभिनेत्याने म्हटलं आहे. मात्र पुढे बोलताना लाडकी बहीण योजनेचा पैसा घेतल्यानंतर सत्ताधाऱ्यांना मतं देऊ नका, असं आवाहन केलं आहे. सध्या ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली असून चर्चाचा विषय ठरत आहे.
हा अभिनेता कोण आणि नेमकं काय म्हटलंय त्याने?
ज्या अभिनेत्यानं आणि ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीनं हा दावा केला आहे त्याचं नाव आहे किरण माने! "लाडक्या बहीणींनो, पैसे परत करू नका. ते त्यांच्या खिशातले नाहीत. आपलेच आहेत. ते पैसे देण्यामागं त्यांचा जो कावा आहे, तो साध्य होऊ देऊ नका. या भुरट्यांना 'मत' देऊ नका," असं किरण माने म्हणाले आहेत. "ठेचायची तर 'नांगी'... नको तिथे घाव घालायचा नाही. पैसे घ्या...पण मत देऊ नका. विषय कट," असं किरण मानेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
बंद मागे घेण्यात आल्यानंतरही केलेली पोस्ट
बदलापूरमधील शाळेमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर शनिवारी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसहीत महाविकास आघाडीने पुकारलेला बंद उच्च न्यायालयाच्या निकालानंतर मागे घेण्यात आला होता. मात्र शनिवारी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्यानंतरही किरण मानेंनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन, "मुसळधार पावसानेच 'महाराष्ट्र बंद' केला. लेकीबाळींच्या न्यायासाठी निसर्ग धावून आला," असं म्हटलं होतं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.