अजित दादांचे आमदार हे काय बोलून गेले; तुमची बायको घेऊन या, सोबतच दुसरी कोणी असेल तर....
इंदापूर (पुणे) - राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा शुक्रवारी इंदापूरमध्ये असणार आहे. येथे अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे आमदार आहेत. जनसन्मान यात्रेत महिलांची संख्या सर्वाधिक पाहिजे.यासाठी आयोजित बैठकीत आमदार दत्तात्रय भरणे असं काही बोलून गेले की त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होत आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे प्रत्येकी 1500 रुपये या प्रमाणे तीन हजार रुपये आतापर्यंत एक कोटी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. इंदापूरमध्ये जनसन्मान यात्रा येणार तेव्हा महिलांची संख्या अधिक असली पाहिजे, असे अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सांगत होते. यावेळी आमदार भरणे म्हणाले की, जन सन्मान यात्रेला आपापल्या बायका घेऊन या… 'मी माझी बायको आणणार आहे. ती कधी बाहेर येत नाही पण मी तिला आणणार आहे.'
आमदार भरणे पदाधिकाऱ्यांना नाव घेऊन सांगू लागले की बायकोला घेऊन या. ते म्हणाले की, व्हाटस्अपला सगळ्यांनी मेसेज पाठवा… महिला भगिनींच इतकं सगळं चांगलं झालंय की, त्यामुळं महिला भगिनी जास्तीत जास्त संख्येने हजर पाहिजेत. तुमची बायको घेऊन या. सोबतच दुसरी कोणी असेल तर तिलाही घेऊन या… आमदार भरणेंच्या या वाक्याने एकच हशा पिकला. तेव्हा तिथेच उपस्थित काहींनी दुसरी म्हणजे तुमच्या बहिणींनाही सोबत घेऊन या, अशी लागलीच सारवासारव केली. आमदार भरणेंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शुक्रवारी इंदापूरला आता किती महिला उपस्थित राहातात याची उत्सूकता सर्वांना लागून राहिली आहे.
आमदार दत्तात्रय भरणे यांचा वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ लोकसभा निवडणुकीदरम्यानही व्हायरल झाला होता. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी मतदान केंद्रावरच सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. आमदार रोहित पवार यांनी तो समाज माध्यमावर पोस्ट केला होता. यामध्ये आमदार दत्तात्रय भरणे सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्याला मतदान केंद्रावरुन निघून जाण्याचे सांगत होते. बारामती अॅग्रोचं कोणी तुझ्या मदतीला येणार नाही. या गावात संध्याकाळी सहा वाजतानंतर तुझे आई-बाप मीच आहे, अशी धमकी देताना दिसत होते. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तेव्हा सारवासारव करत, दत्तात्रय भरणे तिथे नसते तर परिस्थितीत चिघळली असती, असे म्हटले होते.
2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी इंदापूरची जागा प्रतिष्ठेची केली होती. वाट्टेल ते झाले तरी चालेल पण इंदापूरची जागा राष्ट्रवादी सोडणार नाही. भले आघाडी नाही झाली तरी चालेल, असं पवार यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर हर्षवर्धन पाटील काँग्रेसमधून बाहेर पडले आणि भाजपमध्ये दाखल झाले. पण, गेल्या पाच वर्षात राज्यातील राजकारणात मोठे उलट फेर झाले. जे विरोधात होते तेच आता सत्तेतही आले. अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांसह महायुतीमध्ये दाखल झाले आहेत. या आमदारांमध्ये दत्तात्रय भरणे यांचाही समावेश आहे. त्यामुळे पाच वर्षांनी पुन्हा एकदा इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय मामा भरणे आमने-सामने येतात की, बारामती लोकसभेप्रमाणे इंदापूर विधानसभेत मनोमिलन होते हे पाहाणे महत्त्वाचे असणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.