समरजीत घाटगेंसह हर्षवर्धन पाटीलही भाजप सोडणार?; 'आऊटगोइंग'वर बावनकुळे रोखठोकच बोलले!
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी इच्छुक राजकीय नेत्यांकडून नव्या पर्यायांचा शोध घेतला जात असून सत्ताधारी महायुतीला अनेक मतदारसंघांमध्ये धक्के बसत असल्याचं चित्र आहे.
कागलमधील भाजप नेते समरजीतसिंह घाटगे हे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं असून भाजपचे इंदापुरातील नेते हर्षवर्धन पाटील हेदेखील तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत जाणाऱ्यांना कसं थांबवणार, असं म्हणत पक्षातील आऊटगोईंवर शिक्कामोर्तब केलं आहे.
समरजीतसिंह घाटगे यांच्या पक्षांतराविषयी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "महायुतीत कागल विधानसभेची जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे भाजप ती जागा लढू शकत नाही. मात्र समरजीत घाटगे यांना विधानसभा निवडणूक लढवायची आहे आणि त्यामुळेच ते पक्ष सोडण्याचा विचार करत असल्याची बातमी माझ्याकडे आली आहे. त्यांना लढायचंच आहे, तर कोण थांबवणार?" अशा शब्दांत बावनकुळे यांनी आपली भूमिका मांडली.
हर्षवर्धन पाटीलही भाजप सोडणार?
हर्षवर्धन पाटील यांच्याविषयी प्रश्न विचारल्यानंतर बावनकुळे यांनी म्हटलं की, "महायुतीत ज्या जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे गेल्या आहेत त्या जागांवर मागच्या वेळी आमच्या पक्षाकडून लढणाऱ्या नेत्यांना आता थांबायचं नाही. त्यांनी थांबावं अशी आमची विनंती आणि सूचना आहे. मात्र त्यांनी पक्ष सोडायचाच विचार केला तर आम्ही त्यांना थांबवू शकत नाही. महाविकास आघाडीचेही अनेक नेते आहेत, जे निवडणुकीपूर्वी आमच्याकडे येतील. माझं असं म्हणणं आहे की आमच्या नेत्यांनी थोडा संयम ठेवला तर पक्ष काहीतरी निर्णय करेल."
जयंत पाटलांच्या उपस्थितीत होणार घाटगेंचा प्रवेश
विधानसभेच्या मागील निवडणुकीत 'कागल'मध्ये तिरंगी लढत झाली होती. तेव्हा समरजीत घाटगे यांनी ८८ हजार मते घेतली होती. तेव्हापासून त्यांनी भाजपच्या माध्यमातून पाच वर्षे तयारी केली आहे, मध्यंतरी राज्यातील नवीन समीकरणामुळे त्यांची कोंडी झाली. महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांना जाणार आहे. त्यात महाविकास आघाडीचे संजय घाटगे यांनी निवडणुकीतून माघार घेऊन मुश्रीफ यांना पाठिंबा दिल्याने 'कागल'चे राजकारण वेगळ्या वळणावर आले.दरम्यान, समरजीत घाटगे यांनी संपर्क मोहीम राबवली असली तरी ते कोणत्या पक्षातून लढणार याविषयी उत्सुकता होती. आघाडीमध्ये 'कागल'ची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे जाणार असल्याने त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. अखेर त्यांच्या पक्षप्रवेशावर आज शिकामोर्तब झाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.