बांगलादेशमध्ये सत्तांतर घडवून आणणाऱ्या विद्यार्थी नेत्याने भारताला दिला इशारा, म्हणाला...
बांगलादेशमध्ये आरक्षणावरून पेटलेल्या आंदोलनामधून तत्कालीन पंतप्रधान शेख हसिना यांना पद सोडून देशाबाहेर पडावं लागलं होतं. त्यानंतर देशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील काळजीवाहू सरकार काम पाहत आहे.
दरम्यान, बांगलादेशमधील सत्तांतरामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विद्यार्थी नेत्यांपैकी एक असलेल्या नाहिद इस्लाम याने भारताला इशारा दिला आहे. भारत सरकारने बांगलादेशमधील कुठल्याही एका पक्षाला पाठिंबा देणे हे दोन्ही देशांमध्ये आलेल्या कटुतेमागचं एक मोठं कारण आहे, असं विधान त्यानं केलं आहे. नाहिद इस्लाम हा सध्या बांगलादेशची सत्ता चालवत असलेल्या काळजीवाहू सरकारमध्ये माहिती आणि प्रसार सल्लागार आहे.नाहिद इस्लाम याबाबत भारताला सल्ला देताना म्हणाला की, कुठल्याही एका खास पक्षासोबत नाही तर देश आणि त्या देशातील लोकांसोबत संबंध विकसित करून ते कायम ठेवले पाहिजेत, ही बाब भारताने समजून घेतली पाहिजे. राजकीय पक्ष येतात आणि जातात, सरकारं येतात आणि जातात, त्यामुळे देश आणि त्या देशामधील लोकांसोबत संबंध कायम ठेवले पाहिजेत. अवामी लीगसोबतचे संबंझ आणि त्यांच्या सत्तेला भारताचं समर्थन हे उघड गुपित आहे, त्यामुळे येथील लोकांच्या मनात, भारताबाबत संताप आहे, असेही तो म्हणाला.
बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधल्यानंतर भारत आणि बांगलादेशमधील संबंधांबाबत नाहीद याने सांगितले की, भारताशी आमचे ऐतिहासिक संबंध आहेत. त्यात काही चढ उतारही येत असतात. भारत आणि बांगलादेशमधील संबंध हे दोन देशांमधील आणि दोन देशांतील लोकांमधील आहेत. मात्र भारताचे संबंध हे बांगलादेशमधील एका खास राजकीय पक्षासोबत आहेत. येथील जनतेसोबत नाही, असं आम्हाला वाटू लागलं आहे. भारताने बांगलादेशसोबत संबंध प्रस्थापित न करता अवामी लीग पक्षासोबत संबंध प्रस्थापित केलेले आहेत. ही बाब बांगलादेशसोबत भारतासाठीही समस्या वाढवणारी आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.