नातेवाईक महिलेशी असलेल्या मैत्रीच्या रागातून केला अनिकेतचा गेम! मुख्य सूत्रधाराला अटक, एका संशयित तरूणासह चार अल्पवयीन ताब्यात
सांगली : शहरातील जामवाडी येथील मरगुबाई मंदिराजवळ एका पिग्मी एजंट तसेच उत्कृष्ट कबड्डीपटू असलेल्या अनिकेत हिप्परकर या तरूणाचा कोयत्याने डोक्यात वार करून निघृणपणे खून करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. नातेवाईक महिलेशी असलेल्या मैत्रीच्या रागातून खून करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. तर याप्रकरणी एका तरूणासह चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सांगली शहरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.
मंगेश उर्फ अवधूत संजय आरते (वय २७, रा. मरगूबाई मंदिराजवळ, जामवाडी, सांगली) असे मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. याप्रकरणी जय राजू कलाल (वय १८, रा. पटेल चौक, सांगली) याच्यासह चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अनिकेत हिप्परकर जामवाडीतील मरगुबाई मंदिराजवळ थांबला होता. त्यावेळी संशयित आरते, कलाल आणि अल्पवयीन मुले तेथे आली. नातेवाईक महिलेशी असलेल्या मैत्रीच्या संबंधावरून आरते आणि अनिकतेचा यापूर्वीही सतत वाद होत होता. हनुमान जयंतीलाही त्यांच्यात त्या कारणावरून वाद झाला होता.
मंगळवारी सायंकाळी आरते अन्य साथीदारांसमवेत जामवाडीतील मरगूबाई मंदिराजवळ आला. त्यावेळी आरते तेथून थोड्या अंतरावर थांबला होता. त्याच्या अन्य साथीदारांनी त्यांनी पूर्वी झालेल्या वादाचा जाब अनिकेतला विचारला. त्यावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यानंतर आरतेच्या साथीदारांनी त्याच्या सांगण्यावरून अनिकेतवर दोन कोयत्यांनी सपासप वार केले. त्यातील वार वर्मी बसल्याने अनिकेत तेथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर संशयित तेथून पसार झाले. शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील संतोष गळवे, गौतम कांबळे, योगेश सटाले, संदीप पाटील यांना हा खून आरतेसह त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने त्यांचा शोध घेऊन घटनेनंतर केवळ चार तासात सर्व संशयितांना ताब्यात घेतले.याप्रकरणी अनिकेतचा भाऊ संकेत तुकाराम हिप्परकर (वय २३) याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयितांवर कट करून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक सागर गोडे, उपनिरीक्षक केशव रणदिवे, प्रमोद खाडे, महादेव पोवार, विनायक शिंदे, मच्छिंद्र बर्डे, गौतम कांबळे, संतोष गळवे, संदीप कुंभार, योगेश सटाले, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.