Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारतीय बँकांवर मोठा सायबर हल्ला, ३०० बँकांची पेमेंट सिस्टम तात्पुरती बंद

भारतीय बँकांवर मोठा सायबर हल्ला, ३०० बँकांची पेमेंट सिस्टम तात्पुरती बंद
 

भारतीय बँकांवर मोठा सायबर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. देशातील मोठ्या पेमेंट नेटवर्कपासून जवळपास ३०० छोट्या बँकांना वेगळं करण्यात आलंय. सायबर हल्ल्यानंतर कोणत्याही संभाव्य धोक्यापासून रोखलं जावं यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय. या बँकांना टेक्निकल सेवा पुरवणाऱ्या कंपनीवर हा सायबर हल्ला झालाय. त्यामुळे या बँकांची पेमेंट सिस्टीम तात्पुरती बंद झाली आहे. या प्रकरणाशी थेट संबंधित दोन सूत्रांनी रॉयटर्सला ही माहिती दिली.

'सी-एज टेक्नॉलॉजीज' नावाच्या कंपनीवर हा सायबर हल्ला झाला. ही कंपनी देशभरातील छोट्या बँकांना बँकिंग तंत्रज्ञान प्रणाली पुरवते. रॉयटर्सने सी-एज टेक्नॉलॉजीजला यासंदर्भात ई मेलद्वारे विचारणा केली. परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही रॉयटर्सच्या ईमेलला उत्तर दिलं नसल्याचं सांगण्यात आलं.

NPCI नं दिली माहिती

नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ही पेमेंट सिस्टीमवर देखरेख ठेवणारी संस्था आहे. एनपीसीआयनं बुधवारी रात्री एक सार्वजनिक माहिती जारी केली. तसंच एनपीसीआयनं सी-एज टेक्नॉलॉजीजला एनपीसीआयद्वारे चालवल्या जाणाऱ्या किरकोळ देयक प्रणालीपर्यंत पोहोचण्यापासून थांबवलं असल्याचं यात नमूद करण्यात आलंय. सीएज द्वारे सेवा घेणाऱ्या बँकांच्या ग्राहकांना या कालावधीदरम्यान या सेवांचा वापर करता येणार नाही.

एका नियामक प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनं दिलेल्या माहितीनुसार सुमारे ३०० लहान बँका देशाच्या व्यापक पेमेंट नेटवर्कपासून अलिप्त झाल्या आहेत. सायबर हल्ल्याचा प्रभाव आणखी पसरू नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आलंय. यातील बहुतांश छोट्या बँका असून त्याचा परिणाम देशाच्या पेमेंट सिस्टीमच्या केवळ ०.५ टक्के असेल.
यापूर्वी दिला होता इशारा

'भारतात सुमारे १,५०० सहकारी आणि प्रादेशिक बँका आहेत, ज्या बहुतेक मोठ्या शहरांबाहेर कार्यरत आहेत. यातील काही बँकांना याचा फटका बसला आहे,' अशी माहिती सूत्रांनी रॉयटर्सला दिली. दुसऱ्या सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला आणखी पसरू नये यासाठी एनपीसीआय ऑडिट करत आहे. आरबीआय आणि भारतीय सायबर अधिकाऱ्यांनी गेल्या काही आठवड्यात संभाव्य सायबर हल्ल्यांबद्दल भारतीय बँकांना इशारा दिला होता, अशी माहिती बँकिंग उद्योगातील सूत्रांनी दिली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.