नर्सिंगला असलेल्या तरुणीवर रत्नागिरीत अत्याचार; रिक्षातून चंपक मैदानावर नेलं अन् तिच्यावर..
घटनेची माहिती वाऱ्यासारखी सर्वत्र पसरल्यानंतर मोठ्या संख्येने विविध संघटना आणि पक्षाचे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, सर्वसामान्य महिला जिल्हा रुग्णालयात जमा झाले.
रत्नागिरी : बदलापूर आणि कोल्हापुरातील चिमुकल्या मुलींवरील अत्याचारानंतर रत्नागिरीतही तसाच प्रकार घडला आहे.
नर्सिंगला असलेल्या एका १९ वर्षीय तरुणीला रिक्षात घेऊन शहराजवळील चंपक मैदानावर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार काल सकाळी उघड झाला. तरुणीने दिलेल्या जबाबानुसार, पोलिस त्या रिक्षाचालकाच्या शोधात आहेत. या पीडित तरुणीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही बातमी पसरताच शहरात प्रक्षोभ उसळला.
या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात जमाव गोळा झाला. नराधमाला अटक करण्याच्या मागणीसाठी पोलिस अधिकाऱ्यांना जमावाने घेराओ घातला; परंतु पोलिसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. संशयित नराधमावर बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी, जिह्यातील एक १९ वर्षी तरुणी नर्सिंगच्या पहिल्या वर्षाला आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास एसटीने ती साळवी स्टॉपवर आली. तिला चक्कर येण्याची सवय आहे. एसटीतून उतरल्यानंतर तिला मळमळत असल्याने तिने रिक्षाला हात दाखवला; परंतु रिक्षा विरुद्ध बाजूच्या रस्त्याला होती. ती तिथे चालत गेली. रिक्षात बसल्यानंतर मळमळत असल्याने रिक्षाचालकाकडे पाणी मागितले. पाणी प्यायल्यानतंर पुढे काय झाले हे कळलेच नाही, असे तिने जबाबात म्हटले आहे. भान आले तेव्हा चंपक मैदानात नको त्या अवस्थेत ती असल्याचे लक्षात आले. ती कशीबशी रस्त्यावर आली.तिने एका दुचाकीवाल्याकडे मदत मागितली. त्याच्याबरोबर ती चर्मालयात आली. या दरम्यान तिने आई-वडील, बहिणीला फोन करून घडला प्रकार सांगितला. तेव्हा एका नातेवाइकाच्या मदतीने तिला चर्मालयातून घरी साळवीस्टॉप येथे आणले. तेथे नातेवाइकांशी चर्चा झाल्यानंतर ११२ला कॉल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिस तत्काळ दाखल झाले. या दरम्यान तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले होते. तिने सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रमाचा तपास सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी संशयित नराधमाविरुद्ध बलात्काराचा भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) ६४ (१) अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी दिली.
नराधमाला तत्काळ अटक करा
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी सर्वत्र पसरल्यानंतर मोठ्या संख्येने विविध संघटना आणि पक्षाचे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, सर्वसामान्य महिला जिल्हा रुग्णालयात जमा झाले. त्या नराधमाला तत्काळ अटक कला. आमच्या आया, बहिणी सुरक्षित नाहीत. त्याला आताच्या आता आमच्यासमोर आणा, अशा प्रकारे संताप व्यक्त करत पोलिसांना जमावाने घेराओ घातला. आम्ही घटनाक्रम पीडित मुलीकडून समजून घेत आहोत. संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे, असे पोलिस सांगण्याचा प्रयत्न करत होते; परंतु जमाव शांत होत नव्हता. शहर पोलिस निरीक्षक महेश तोरसकर, उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईणकर यांच्यासह मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त ठेवला.
सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले
साळवी स्टॉप ते चंपक मैदानापर्यंतच्या सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपसण्यात आले. त्यामध्ये या मुलीच्या हालचाली कैद आहेत; परंतु त्यापुढे काय झाले हे कळलेले नाही. या दरम्यान तरुणीची वैद्यकीय तपासणी करून पोलिसांनी तिचा जबाब घेतला. यामध्ये तिच्या अंगावर ओरखडे, जखमा आहेत. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर अत्याचार झाल्याचे पुढे आले आहे.
रिक्षाचालकांची माहिती घेणे सुरू
पोलिसांनी साळवी स्टॉप येथील थांब्यावरील रिक्षाचालकांची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. कोण-कोण रिक्षा व्यावसायिक या थांब्यांवर थांबतात, त्याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. साळवी स्टॉप ते चंपक मैदानापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. त्यामुळे काहीतरी धागा मिळेल, अशी पोलिसांची अपेक्षा आहे.
शहरात उसळला जनप्रक्षोभ
शहराजवळील या घटनेनंतर जनप्रक्षोभ उसळला. आरोपीला अटक करा, फाशीची शिक्षा द्या, अशा घोषणा देत नागरिकांनी रस्त्यावर उतरत जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर दोन वेळा रास्तो रोको करण्यात आला. त्यामुळे वातावरण तंग झाले होते. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. संतापलेले नागरिक जिल्हा रुग्णालयात ठाण मांडून होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.