बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. एक लाखाची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन केल्याप्रकरणी बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात झालेले उत्खनन कमी दाखवण्यासाठी मंडळ अधिकार्याने दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती, तडजोडीअंती दीड लाख ठरल्यानंतर पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये स्विकारताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंडळ अधिकार्यास रंगेहाथ पकडण्यात आलं. बीड एसीबीने केलेल्या या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
सचिन भागवत सानप असे या बीड शहरच्या लाचखोर मंडळ अधिकार्याचे नाव आहे. तक्रारदाराच्या नातेवाईकांसह इतरांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात अवैध मुरुम उत्खनन संदर्भात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्या संदर्भात मंडळ अधिकारी सानप याने बीड तरफ खोड सज्जा अंतर्गत मोची पिंपळगाव येथील गट क्रमांक 49 मधील मुरुम उत्खनन जागेचा पंचनामा केला होता.
नमुद पंचनाम्यात एक हजार ब्रास ऐवजी 500 ब्रास उत्खनन दाखवून तक्रारदार यांना लाभ मिळवून देण्यासाठी सानपने पंचसमक्ष दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती दीड लाख रुपये देण्याचे ठरले. यातील पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये स्विकारताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बीड एसीबीने मंडळ अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.