राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर राणेंनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं! रात्री पावणे दोनला...
राजकोट किल्ल्यावर बुधवारी झालेल्या राड्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोशल मीडियावरुन पुन्हा डिवचलं आहे. रात्री पावणे दोनच्या सुमारास निलेश राणेंनी आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) हॅण्डलवर पोस्ट करत ठाकरेंना आव्हान दिलं आहे. सध्या निलेश राणेंची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.
किल्ल्यावर नक्की घडलं काय?
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर पहाणीसाठी पोहोचलेले आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार नारायण राणे यांच्या कार्यकर्तांमध्ये तुफान राडा झाल्याचं चित्र बुधवारी पाहायला मिळालं. राजकोट किल्ल्यावरच दोन्ही नेत्यांचे समर्थक आपापसात भिडले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीने मालवणमध्ये धडक मोर्चाची घोषणा केली होती. या मोर्चासाठी मालवणमध्ये पोहोचलेल्या आदित्य ठाकरेंनी ज्यावेळी किल्ल्याला भेट दिली त्याचवेळी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेही पहाणीसाठी आले होते. त्यामुळे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने-सामने आले. पोलिसांनी यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना रोखलं. मात्र काही वेळाने दोन्ही बाजूचे कार्यकर्ते पुन्हा एकदा भिडले.
निलेश राणेंनी पुन्हा डिवचलं
किल्ल्यावरील या वादानंतर निलेश राणेंनी सोशल मीडियावरुन पुन्हा ठाकरेंना आव्हान दिलं आहे. "ठाकरे यांची खरी लायकी महाराष्ट्राला कळली. ठाकरे (स्वत:) आमदार, (त्यांच्यासोबत) एक विरोधी पक्ष नेता आणि एक माजी खासदार (सोबत) असून सुद्धा हतबल झाले," असं निलेश राणे म्हणाले आहेत. "अडीच तास लपून बसावं लागलं. उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या) कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांसमोर मार खाल्ला. मैदान सोडून एका बाजूने सटकावं लागलं," असं निलेश राणेंनी म्हटलं आहे. पोस्टच्या शेवटी त्यांनी, "हा ट्रेलर होता अर्धा तास अजून थांबला असता तर पूरा पिक्चर दाखवला असता," असा इशारा दिला आहे. तर पोस्टच्या शेवटी, "आदित्यसारखा घाबरट मी बघितला नाही," असं म्हणत थेट आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
कोंबड्यांचा उल्लेख करत आदित्य यांचा टोला
दरम्यान, किल्ल्यावरील बाचाबाची आणि राड्यावर प्रतिक्रिया नोंदवताना आदित्य ठाकरेंनी, "आम्ही येथे नीट येत होतो. ही काय लढाई करण्याची जागा आहे. ही बालबुद्धी किती दिवस सहन करायची. माझ्यावर हल्ला करण्याचा 100 टक्के हेतू होता. कारण ते मला घाबरतात. पण माझ्या खिशात कोंबड्या नाहीत," असा टोला लगावल्याचं पाहायला मिळालं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.