शस्त्रक्रिया करताना भूल जास्त दिली गेल्यामुळं मुंबईतील पोलीस कॉन्स्टेबल गौरी पाटील यांचा मृत्यू
मुंबई पोलीस दलातील २८ वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबलचा अंधेरीतील एका
रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कानावर शस्त्रक्रिया करण्याआधी
गरजेपेक्षा जास्त भूल (अॅनेस्थेशिया) दिली गेल्यामुळं हा अनर्थ घडल्याचं
समोर आलं आहे.
आंबोली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. गौरी सुभाष पाटील
असं मृत्यू झालेल्या महिला कॉन्स्टेबलचं नाव आहे. त्या कांदिवली इथं राहत
होत्या. मुंबई पोलिसांच्या स्थानिक शस्त्र विभागात त्यांची नियुक्ती
करण्यात आली होती. कानावरील शस्त्रक्रियेसाठी त्यांना अंधेरी (पश्चिम)
येथील ॲक्सिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
गौरी पाटील यांच्यावर शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्याचं ठरलं होतं, मात्र
डॉक्टरांनी अचानक गुरुवारी ती करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेआधी
त्यांना भूल देण्यात आली. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली,' अशी माहिती
गौरी पाटील यांचे बंधू विनायक पाटील यांनी दिली.
डॉक्टरांनी नातलगांना काय सांगितलं होतं!
रक्तदाब वाढल्यामुळं गौरीची प्रकृती खालावली आहे. तिला आयसीयूमध्ये हलवावं लागत आहे, असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं. मात्र काही तासांनंतर त्यांनी कोणतंही स्पष्ट कारण न देता तिच्या निधनाची बातमी दिली. मात्र हा मृत्यू अॅनेस्थेसियाच्या ओव्हरडोसमुळं झाल्याचं नंतर आम्हाला समजलं, असं विनायक पाटील यांनी सांगितलं.मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर आंबोली पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलला भेट दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आला. गौरी यांचा मृत्यू नेमका कशामुळं झाला हे शवविच्छेदनानंतरच कळू शकणार आहे. पोलिसांनी तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
कुटुंबीयांना धक्का
'माझ्या आई-वडिलांना या दुःखद घटनेनं धक्का बसला आहे. गौरी २०१७ मध्ये पोलीस दलात रुजू झाली होती. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळं तिला जीव गमवावा लागला आहे. रुग्णालय आणि संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विनायक पाटील यांनी केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.