Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बलात्कार करणाऱ्या नराधम मेला, मृतदेह पुरायला जमीन सुद्धा दिली नाही

बलात्कार करणाऱ्या नराधम मेला, मृतदेह पुरायला जमीन सुद्धा दिली नाही
 

आसाम: बलात्काराच्या बातम्यांनी सध्या संपूर्ण देश हादरला आहे. कोलकाता, उत्तराखंड, मुंबईपाठोपाठ आता आसाममधून बलात्काराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. आसाममधल्या नागाव जिल्ह्यात बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीने तलावात उडी मारून जीव दिला आहे.

त्याच्या मृतदेहाला गावातल्या कब्रस्तानात स्थान न देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. तफजुल इस्लाम असं या मृत आरोपीचं नाव आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी तफजुल इस्लामला अटक केली होती. शनिवारी सकाळी तो फरार झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी त्याला अटक करण्यात आली होती. पहाटे साडेतीनच्या सुमारास त्याला क्राइम सीनची माहिती घेण्यासाठी घटनास्थळी नेण्यात आलं होतं. पोलिस म्हणाले, आरोपी तफजुल इस्लाम पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला आणि त्याने तलावात उडी मारली. दोन तासांनी त्याचा मृतदेह मिळाला, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं. दरम्यान, आरोपीच्या गावाने त्याच्या अंत्यसंस्कारांमध्ये सहभागी न होण्याचा, शिवाय त्याला कब्रस्तानात जागा न देण्याचा निर्णय घेतला. स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत माहिती दिली. 'अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीच्या अंत्ययात्रेत आम्ही सहभागी होणार नाही. त्याच्या कुटुंबावर आम्ही बहिष्कार घातला आहे. त्याच्या दफनविधीसाठीही आम्ही कब्रस्तानात जागा न देण्याचा निर्णय घेतला आहे,' असं सकलेन नामक ग्रामस्थाने सांगितलं.

नागावचे पोलीस अधीक्षक स्वप्नील डेका म्हणाले, हा आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला आणि त्याने तलावात उडी मारली. एसडीआरएफला माहिती देऊन शोधकार्य सुरू केलं. त्यानंतर दोन तासांत आरोपीचा मृतदेह ताब्यात मिळाला. या प्रकरणात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अद्याप दोन आरोपी फरार असून त्यांचा तपास सुरू असल्याचं डेका यांनी स्पष्ट केलं.

(सांगली पुन्हा हादरली, 15 वर्षांच्या मुलीवर 35 वर्षीय नराधमाकडून बलात्कार; आरोपीला अटक)

बुधवारी संध्याकाळी आरोपीने 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. ही मुलगी त्या वेळी ट्यूशनवरून परत येत होती. तिच्यावर बलात्कार करून तिला जखमी अवस्थेत सोडून आरोपी साथीदारांसह फरार झाला होता. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी आरोपीला कठोर शिक्षा करण्याचे आदेश दिले होते. 'बंगालमध्ये महिलांवर अत्याचार होतात तेव्हा आरोपींना पाठीशी घातलं जातं, आसाममध्ये असं केलं जाणार नाही,' असं सांगून सरमा यांनी आसाम राज्याच्या पोलीस महासंचालकांना घटनास्थळाला भेट देऊन आवश्यक तपास पूर्ण करून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे आदेश दिले होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.