Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बारामतीच्या दिशेने आली लाल दिव्याची गाडी अन्.. टोलनाक्यावर आरटीओच्या साहेबाची दबंगगिरी

बारामतीच्या दिशेने आली लाल दिव्याची गाडी अन्.. टोलनाक्यावर आरटीओच्या साहेबाची दबंगगिरी
 

उंडवडी सुपे ( ता. बारामती) येथील टोल नाका, वेळ दुपारी बाराची. टोल नाक्यावर बारामतीच्या दिशेने आर.टी.ओ. कार्यालयाची एक लाल दिव्याची चार चाकी गाडी येते. आणि टोल नाका पास न करताच पुन्हा माघारी फिरुन टोलनाक्या जवळच थांबते.

गाडीत चालकासह खाक्या वर्दीत चौघेजण बसलेल्यापैकी एक साहेब टोल नाक्यावर काम करणा-या एका युवकाला व त्याच्या मॅनेजरला गाडीजवळ बोलावून घेतो. आणि दोघांना दमबाजी करतो. आणि त्या दोघांना ओळखपत्र मागतो. व कर्मचा-याला गाडीत बसवतो. मॅनेजरच्या मध्यस्थीनंतर त्या टोल कर्मचा-याला खाली उतरवून भर रस्त्यावर कान धरुन उठाबश्या काढायला लावतो.
हा प्रकार उपस्थित वाहनचालकांसह इतर टोल कर्मचारी आश्चर्यचकीत होवून पाहतात. मात्र हा प्रकार समजण्याअगोदरच लाल दिव्याची गाडी बारामतीच्या दिशेने निघून जाते. मग शेवटी आर.टी.ओ साहेबांचा राग सर्वांनाच समजतो.

असे घडले होते की, तीन दिवसापूर्वी आर.टी.ओ कार्यालयाचा एक साहेब, त्याच्या खाजगी गाडीने या टोल नाक्यावरुन पाटसकडे जात असताना टोल नाक्यावर आल्यानंतर त्या साहेबाला टोल कर्मचारी संदीप लोंढे यांनी टोल भरण्यासाठी अडविले होते. त्यावेळी त्यांनी आपली ओळख सांगितली होती. मात्र त्यावेळी संदीप लोंढे यांनी खात्री करण्यासाठी ओळखपत्र मागितले होते.

ही बाब त्या आरटीओच्या साहेबाला खटकली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी आज सोमवारी दुपारी बारा वाजता आरटीओ साहेब सरकारी लाल दिव्याची गाडी घेवून वर्दीत चौघांसमवेत आले होते. त्यांनी त्या दिवशी झालेल्या प्रकाराचा बदला आज घेतला. अशी चर्चा या घटनेनंतर परिसरात दिवसभर रंगली.
याबाबत येथील टोल नाका मॅनेजर संतोष खापरे म्हणाले, 'आमची कोणतीही चूक नसताना आरटीओ साहेबांनी आम्हाला दमदाटी व अरे रावची भाषा वापरुन त्रास दिला. आम्ही त्यांची माफी देखील मागितली. मात्र तरी देखील आमच्या कर्मचा-याला खूप अपमानीत केले. घडलेला प्रकार आम्ही आमच्या वरिष्ठांना कळविला असून याबाबत आमच्याकडे सीसीटिव्ही कॅमेरा फूटेज असून आम्ही रितसर पोलिसात आणि आरटीओ कार्यालयाच्या वरीष्ठ अधिका-यांकडे लेखी तक्रार दाखल करणार आहोत.'

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.