Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोरोना-कायद्याचा भंग : मिरजेतील दोघा भावांना शिक्षा व दंड

कोरोना-कायद्याचा भंग : मिरजेतील दोघा भावांना शिक्षा व दंड
 

सांगली :  कोरोना कायद्याचा भंग करून शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल अमोल बाबासो पवार (वय ३६ वर्ष ) व राहूल बाबासो पवार ( वय ३२ वर्ष, दोघेही रा. लक्ष्मीवाडी, मिरज, ता. मिरज, जि. सांगली) यांना साथरोग ३ महिने सक्तमजुरी व प्रत्येकी एक लाख एक हजार रुपये दंडाची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी के शर्मा यांनी सुनावली. सरकापक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्रीमती. ज्योती एस. डाके यांनी काम पाहिले.

अमोल व राहुल पवार यांना साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७, कलम २-ब , कलम ३(२) (१) तसेच भा.दं.वि.स. कलम ३५३ अन्वये दोन्ही आरोपींना दोषी धरण्यात आले. साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७, कलम २-ब चा भंग करून सदर कायद्याखाली कलम ३(२) (१) अन्वये प्रत्येकी रक्कम रु. ५०,०००/- दंड व दंड न भरलेस तीन महिन्याच्या सक्तमजुरीची शिक्षा आणि भा.दं.वि.स. कलम ३५३ अन्वये प्रत्येकी १ हजार रुपये दंड व दंड न भरलेस १५ दिवसांची साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली.
        
खटल्याची पार्श्वभूमी अशी- कोरोना काळात आनंद बाबुराव संकपाळ हे पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मीवाडी येथे तपासणी नाक्यावर शासकीय काम बजावत होते.दि. १८ जुलै २०२० रोजी रात्री ९.१५ वा. च्या सुमारास अमोल पवार हे विनाकारण त्या तपासणी नाक्याजवळ थांबले होते.  त्यावेळी फिर्यादी आनंद संकपाळ यांनी अमोलला सांगितले की सध्या सर्वत्र कोरोना-१९ विषाणूचा प्रादुर्भाव पसरत असल्याने तसेच संचारबंदी आदेश लागू असल्याने तू इथून निघून जा.
         
त्यावेळी अमोलने संकपाळ यांच्याशी वाद घालत " तू कोण मला सांगणार, मी इथेच बसणार मी इथून जाणार नाही. तू इथेच थांब, मी कोण आहे ते तुला दाखवतो" असे म्हणून वाद घातला व त्याचा भाऊ राहुल याला घटनास्थळी बोलावून घेतले. थोड्याच वेळात  राहुल तिथे आला व दोघा भावानी संकपाळ यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली व शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात दोघाविरुद्ध भा.दं.वि.स. कलम ३५३, ३३२,१८८, २७१, २९० व ३४ सह साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७, कलम २-ब चा भंग करुन सदर कायद्याखाली कलम ३ (२) (i) अन्वये गुन्हा दाखल झाला. या गुन्हयाचा तपास फौजदार एम.व्ही. जाठार यांनी करुन दोषारोप पत्र दाखल केले.  सरकार पक्षातर्फे एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले.फिर्यादी आनंद संकपाळ व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सरकार पक्षाला मिरज ग्रामीण पोलीस ठाणेचे हवालदार शामकुमार साळुंखे व जिल्हा न्यायालयातील पैरवी कक्षांतील कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.