बदलापूरनंतर अकोला, शिक्षकच निघाला भक्षक; शाळेतल्या 6 मुलींचा लैंगिक छळ
अकोला : बदलापूरमधल्या शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. बदलापूरची ही घटना ताजी असतानाच आता अकोला जिल्ह्यातील उरळमध्येही असाच संतापजनक प्रकार घडला आहे.
अकोला जिल्ह्यातील काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने 6 मुलींचा लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. आज संध्याकाळी याप्रकरणी आरोपी शिक्षक प्रमोद सरदारविरुद्ध कलम 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा शिक्षक 8वीच्या मुलींना अश्लिल व्हिडिओ दाखवत होता. तसंच मागच्या 4 महिन्यांपासून तो शाळेत शिकणाऱ्या मुलींचा छळ करत होता. विद्यार्थिनींना अश्लिल चित्रफित दाखवून वाईट स्पर्श करत होता. शाळेतल्या विद्यार्थिनींसोबत अश्लिल गप्पाही मारत होता.
पीडित विद्यार्थिनींनी याबाबत पालकांना सांगितल्यानंतर प्रमोद सरदार या विकृत शिक्षकाचे कृत्य उघडकीस आलं. पालकांनी उरळ पोलिसांकडे धाव घेत शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली यानंतर 6 मुलींचा जबाबही नोंदवून घेण्यात आला. यानंतर उरळ पोलिसांनी शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
बदलापूर प्रकरणानंतर उद्रेक
बदलापूरच्या नामांकित शाळेमध्ये सफाई कर्मचाऱ्याने दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा घटनेचे पडसाद आज उमटले. आंदोलकांनी बदलापूर स्टेशनवर रेल रोको केला, त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता. या प्रकरणातल्या दोषीला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी जमाव बदलापूर स्टेशनवर आला होता. सरकारकडून गिरीश महाजन यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे प्रयत्नही निष्फळ ठरले आणि गिरीश महाजन यांना बदलापूर स्टेशनवरून काढता पाय घ्यावा लागला. यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाला रेल्वे स्टेशनबाहेर काढलं, त्यानंतर रेल्वे सेवा सुरू झाली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.