नराधमाच्या अत्याचारानंतर व्यवस्थेकडूनही फरफट; वैद्यकीय तपासणीला लागले 3 दिवस
बदलापुरातील शाळेत लैंगिक अत्याचार झालेल्या चिमुकलीची वैद्यकीय तपासणीसाठीही मोठी फरपट झाल्याचं समोर आलंय. कारण या मुलीच्या वैद्यकीय तपासणीसाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात तब्बल ३ दिवस लागले.
याप्रकरणी मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरांची शनिवारी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाकडून चौकशी करण्यात आली. बदलापूर चिमुकलींवर अत्याचार प्रकरणी एफआयआर नोंदवल्यानंतर तब्बल तीन दिवसांनी मुलीची वैद्यकीय चाचणी केली गेल्यानं डॉक्टर आणि आरोग्य विभागाकडूनही गंभीर प्रकरणात दिरंगाई केली गेल्याचं समोर आलंय.
पोलिसांनी या प्रकरणात १६ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा एफआयआर नोंदवल्यानंतर चिमुकलीची शासकीय वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यासाठी १७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता आधी तिला बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलं. मात्र तिथे सुविधा नसल्यानं त्यांनी रात्री २ वाजता तिला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात पाठवलं. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी काही चाचण्या केल्या, आणि उर्वरित चाचण्या सकाळी करण्यास बोलावलं. १७ ऑगस्टला सकाळी तिथे तपास यंत्रणांचे प्रतिनिधी नसल्यानं त्या दिवशीही तपासणी पूर्ण झाली नाही. त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी रविवार असल्यानं बाहेरून येणारे डॉक्टर्स नसल्यानं तिची चाचणी होऊ शकली नाही. अखेर सोमवारी रक्षाबंधनाच्या दिवशी या चिमुकलीची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली. त्यामुळं आधी लैंगिक अत्याचार आणि मग सरकारी कारभारामुळे पीडितेसह कुटुंबियांची फरफट झाली.
इतक्या गंभीर प्रकरणात चिमुकलीच्या वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालय प्रशासनाने केलेल्या या दिरंगाईची माहिती मिळताच राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाकडून शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोहर बनसोडे यांच्यासह रुग्णालयातील अन्य डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय यांची चौकशी करण्यात आली.याबाबत शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोहर बनसोडे यांना विचारलं असता, आमच्या रुग्णालयात आल्यानंतर १७ तारखेला त्या पीडित मुलीची तपासणी करण्यात आली. मानसोपचार तज्ञ उपलब्ध नसल्यामुळे दुसऱ्या दिवशी बोलवण्यात आले होते. मात्र दुसऱ्या दिवशीही रविवार आल्यामुळे या चिमुकलीची कौन्सिलिंग सोमवारी पूर्ण करण्यात आली. तपासणीसाठी उशीर झाला नाही. मात्र मानसोपचार तज्ञ बाहेरून येत असल्यानं कौन्सिलिंगसाठी सोमवारची वाट पहावी लागली, असं स्पष्टीकरण त्यांनी फोनवरून दिलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.