सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा सोमवारी, 26 ऑगस्ट रोजी कोसळला.
या पुतळण्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भारतीय नौदल दिनानिमित्त म्हणजेच 4 डिसेंबर 2024 रोजी करण्यात आलं होतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. मात्र अवघ्या आठ महिन्यांतच हा पुतळा कोसळल्याने संताप व्यक्त केला जात आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरुन संताप व्यक्त केला असतानाच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हे शिल्प साकारणाऱ्या मूर्तीकाराच्या मुलाखतीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. मूर्तीकाराची ही मुलाखत व्हायरल झाली आहे.
फोटोत काय आहे?
'सनातन प्रभात' या वृत्तपत्राच्या 4 डिसेंबर 2023 च्या अवृत्तीमध्ये छापून आलेली मूर्तीकार जयदीप आपटे यांच्या मुलाखतीचा फोटो आव्हाड यांनी शेअर केला आहे. या मुलाखतीमध्ये जयदीप आपटे यांनी ही मूर्ती साकारताना त्यांच्या समोर कोणती आव्हाने आली, कोणी त्यांना सहकार्य केलं याबद्दल भाष्य केलं आहे. याच मुलाखतीमधील एक मुद्दा आव्हाड यांनी अधोरेखित केला आहे. "नौदल अधिका-यांच्या सूचनांनानुसार बनवलेली शिल्पे निवडली न जाता अचानक घडलेले शिल्प निवडले गेले." छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मूर्तीकार जयदीप आपटे यांनी दिलेली ही कबुली आहे," असं म्हणत आव्हाड यांनी शिल्पाची निवड करतानाच चूक झाल्याचं अधोरेखित केलं.
ज्या पुतळ्याच्या कामाला तीन वर्षे लागतात तो पुतळा...
"ज्या पुतळ्याच्या कामाला तीन वर्षे लागतात तो पुतळा अवघ्या सहा महिन्यात बनवला गेला असेल तर कामाच्या दर्जा काय असेल, हे सांगण्यासाठी कुठल्याही तज्ज्ञाची आवश्यकता नाही. जे काही करायचे ते निवडणूक प्रचारासाठी हे या सरकारचे सुरूवातीपासूनचे धोरण आहे. परंतु आज त्यांच्या या धोरणाने महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का बसला आहे. ज्यांच्या नावाने आणि कर्तृत्वाने मराठी माणूस जगभर ताठ मानेने हिंडतो आज त्याच छत्रपतींच्या पुतळ्याची झालेली विटंबना या पापाला कुठलंही प्रायश्चित नाही," असं आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी
ज्या कंत्राटदाराने पुतळा उभारला त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे. "सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आज कोसळला, तो पुतळा उभारण्याचे काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले होते. त्याने आपले काम कसे केले असावे हे आता उघड झाले आहे. हि व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीत टाकायला हवे," अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केलीय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.