भारतातील सर्वात मोठा आयकर छापा, सलग 10 रात्रंदिवस मोजल्या नोटा; फिल्मसारखा सीन
इन्कम टॅक्स विभागाच्या छाप्याबद्दल ऐकून भल्याभल्यांनाही घाम फुटतो. आयकर विभाग वेळोवेळी अनेक श्रीमंतांच्या घरांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणात बेकायदा रक्कम आणि मौल्यवान वस्तू जप्त करतो.
देशातला आतापर्यंतचा सर्वांत मोठा छापा कोणता आहे आणि त्यात किती रक्कम वसूल झाली आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? 21 ऑगस्ट रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर विभागाच्या एका टीमचा सन्मान केला. या टीमने आजपर्यंतचा सर्वांत मोठा छापा टाकला आहे. या टीमने गेल्या वर्षी ओडिशातल्या एका डिस्टिलरी ग्रुपवर छापा टाकून सर्वाधिक 352 कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती.
पथकाला 'सीबीडीटी सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स'
भारतात आयकराला 165 वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त भुवनेश्वरमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात निर्मला सीतारामन यांनी आयकर अन्वेषण विभागाचे मुख्य संचालक एस. के. झा आणि अतिरिक्त संचालक गुरप्रीत सिंग यांच्या नेतृत्वाखालच्या पथकाला 'सीबीडीटी सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स' देऊन गौरव केला.
गुरप्रीत सिंग 2010च्या बॅचचे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस (IRS) अधिकारी आहेत. त्यांनी गेल्या वर्षी 6 डिसेंबर रोजी कारवाईक्षम गुप्त माहितीच्या आधारे ओडिशातल्या एका डिस्टिलरी ग्रुपच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
3 डझन मशीन, 10 दिवस शोधमोहीम
आयकर विभागाची ही शोधमोहीम 10 दिवस सुरू होती. या कालावधीत एकूण 351.8 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. देशातल्या कोणत्याही एजन्सीच्या एकाच कारवाईतली सर्वांत मोठी जप्ती म्हणून या मोहिमेची नोंद झाली आहे. या छाप्यादरम्यान आयकर विभागाने जमिनीवर स्कॅनिंग व्हील असलेली मशीन वापरल्या होत्या, जेणेकरून खाली दडलेल्या मौल्यवान वस्तूंची तपासणी करता येईल. याशिवाय विभागाने नोटा मोजण्यासाठी तीन डझन मशीन्सही मागवून घेतली होती. ही रोकड मोजण्यासाठी विविध बँका आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची मदत घेतली गेली होती.आयकर विभागाने थकबाकीच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मोठी तयारी केली आहे. आयकर विभागाने अधिकाऱ्यांना 5000 प्रकरणांवर लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे. कारण, यातून 4300000 कोटी रुपयांची वसुली करायची आहे. या वसुलीमध्ये पुन्हा एकदा छापेमारी होण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.