Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पाय घसरला तर मृत्यू अटळ, रायगड किल्ल्यावरील पाण्याचा VIDEO व्हायरल

पाय घसरला तर मृत्यू अटळ, रायगड किल्ल्यावरील पाण्याचा VIDEO व्हायरल


राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. रायगड जिल्ह्यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. सर्वत्र पाणीच पाणी पहायला मिळत आहे. अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अशातच आता रायगड किल्ल्यावरील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात मुसळधार पावसामुळे किल्ल्यावरुन जोरात पाणी खाली कोसळत असल्याचे दिसत आहे. या पाण्याच्या आजूबाजूला काही पर्यटक अडकलेले दिसत आहेत.

या व्हिडिओ मध्ये दिसत आहे की, किल्ल्याच्या वरच्या बाजूने पाण्याचा प्रवाह वेगाने खाली येत आहे. या पाण्याच्या प्रवाहात काही पर्यटक अडकून पडले आहेत. हा प्रवाहाचा वेग इतका जास्त आहे की, एखाद्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात वाहून गेला तर त्याचा मृत्यू अटळ आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. तसेच अनेकांनी या पर्यटकांबाबत चिंता व्यक्त केली आहे. मात्र या पर्यटकांना रोपवेच्या मदतीने वाचवण्यात आले आहे.

पाहा VIDEO

रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद

सतत पडत असलेल्या पावसामुळे रायगड किल्ल्यावरील काही ठिकाणी दरड कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. रायगड किल्ल्याकडे जाणारे दरवाजे आणि रस्ते बंद करण्यात आले आहेत. याशिवाय येथे पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडत आहे. आजही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. राजधानी मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये अशी सुचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून काही ठिकाणी NDRF च्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.

शाळांना सुट्टी

हवामान विभागाने आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन प्रशासनाने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.