Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रेल्वेमध्ये बसला भिकाऱ्यासारखा दिसणारा व्यक्ती :, BSF च्या जवानांनी तपासण्यासाठी बॅग उघडताच सगळे हादरून गेले

रेल्वेमध्ये बसला भिकाऱ्यासारखा दिसणारा व्यक्ती :, BSF च्या जवानांनी तपासण्यासाठी बॅग उघडताच सगळे हादरून गेले
 
 
 
नवी दिल्ली : रेल्वे स्थानकावर अचानक साध्या वेशातील सीमा सुरक्षा दलाची तुकडी एक एक करून ट्रेनच्या आत शिरू लागली. प्रवासादरम्यान या बीएसएफ जवानांचे लक्ष भिकाऱ्यासारख्या दिसणाऱ्या माणसावर गेलं. या व्यक्तीला पाहिल्यानंतर बीएसएफ टीमला जाणवलं की, कदाचित हीच ती व्यक्ती आहे ज्याच्या शोधात ते ट्रेनमध्ये घुसले होते. गेदेहून सियालहदला जाणारी ट्रेन मझरिया रेल्वे स्थानकावर येताच ही तुकडी आत शिरली होती.

काही काळ या व्यक्तीच्या हालचालींवर नजर ठेवल्यानंतर बीएसएफची टीम त्याच्यापर्यंत पोहोचली. या व्यक्तीला काही समजण्यापूर्वीच बीएसएफच्या पथकाने त्याला घेरलं. अचानक आपल्या आजूबाजूला एवढी माणसं पाहून या व्यक्तीला संशय आला. ही व्यक्ती आता बीएसएफ जवानांच्या तावडीतून सुटण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न करत होती.
हा व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी होण्यापूर्वीच बीएसएफच्या जवानांनी त्याला पकडलं. त्यानंतर या व्यक्तीकडे असलेल्या बॅगची झडती घेतली गेली. झडतीदरम्यान या व्यक्तीच्या बॅगेतून एक वस्तू सापडली, जी पाहून बीएसएफ जवानांसह तिथे उपस्थित असलेल्या सर्व प्रवाशांचे डोळे विस्फारले. प्रत्यक्षात भिकाऱ्यासारख्या दिसणाऱ्या या व्यक्तीच्या बॅगेतून सोन्याची वीट सापडली आहे.

बीएसएफच्या म्हणण्यानुसार, या व्यक्तीच्या बॅगेतून जप्त करण्यात आलेल्या सोन्याच्या विटेचं वजन सुमारे एक किलो आहे, ज्याची बाजारातील किंमत सुमारे 69 लाख रुपये आहे. सोन्याची वीट जप्त केल्यानंतर बीएसएफने या व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि मयूरहाट रेल्वे स्टेशनवर उतरवलं. महेश विश्वास असं या ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव असून तो मूळचा पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील रहिवासी आहे.

बीएसएफच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, गेदे सीमा चौकीवर तैनात असलेल्या 32 व्या बटालियनला सियालदहला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एक संशयित व्यक्ती असल्याची गुप्तचर माहिती मिळाली. हा संशयित तस्करीच्या माध्यमातून आणलेल्या सोन्याची खेप घेऊन कोलकाता येथे जात होता. इंटेलच्या आधारे, बीएसएफची टीम वेळ न घालवता निघाली आणि मझरिया रेल्वे स्टेशनवर ट्रेनमध्ये चढली.

त्यांनी सांगितलं की, प्रथम प्रोफाइलिंगच्या मदतीने या व्यक्तीची ओळख पटवली गेली. झडतीदरम्यान एक किलो वजनाची सोन्याची वीट सापडल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. ताब्यात घेतल्यानंतर या संशयित व्यक्तीला गेदे सीमा चौकीवर आणून चौकशी सुरू करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपीने सांगितलं की, तो बानपुरहून लोकल ट्रेनमध्ये चढला होता आणि त्याला पायराडांगा रेल्वे स्टेशनवर उतरायचं होतं.
पायराडांगा रेल्वे स्थानकावर तो एका व्यक्तीला भेटायला जात होता, त्याला सोन्याची वीट द्यायची होती. ओळख म्हणून त्या व्यक्तीला एक रुपयाच्या नोटेचा अनुक्रमांक सांगावा लागतो. त्याच्या योजना यशस्वी होण्यापूर्वीच त्याला अटक करण्यात आली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.