Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भुजबळसाहेब, पवारसाहेबांना ताप असताना भेटण्यासाठी एवढा हट्ट कशाला हो?- मधुकर भावे

भुजबळसाहेब, पवारसाहेबांना ताप असताना भेटण्यासाठी एवढा हट्ट कशाला हो? - मधुकर भावे


पवारसाहेबांना भेटायला भुजबळसाहेब त्यांच्या निवासस्थानी गेले. भुजबळ यांनी पवारसाहेबांवर रविवारी जाहिरपणे टीका केली होती. महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ बिघडवण्याच्या चर्चेत भुजबळ यांनी एक बोट पवारसाहेबांकडे दाखवले होते. भुजबळसाहेब पवारसाहेबांना आपला 'विठ्ठल' आहे, असे म्हणतात. पण हा 'विठ्ठल' कटेवर हात ठेवून उभा राहणारा नाही. 

पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रातील कोणत्याही प्रश्नांसाठी महाराष्ट्र पिंजून काढणारा हा विठ्ठल आहे. निवडणूक असो.... नसो... हा विठ्ठल शेतात, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, लोकांच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्रभर फिरणारा आहे. तो दमू शकतो... थकू शकतो... अतिश्रमाने त्याला ताप येऊ शकतो... त्यांनाही विश्रांतीची गरज आहे... हे राजकारणात मुरलेल्यांना तरी थोडेसे समजायला हवे होते. पवारसाहेबांची तब्बेत थोडेशी बिघडली आहे. महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय स्वास्थ बिघडू नये, यासाठी त्यांना लवकर आराम पडावा, अशी शुभेच्छा देणे वेगळे. पण भुजबळांची भूमिका उलटी होती. रविवारी टीका करून लगेच सोमवारी पवारसाहेबांना भेटण्याची एवढी घाई करण्याची गरज नव्हती. पवारसाहेबांच्या अंगात ताप असताना थोडी विश्रांती घेण्यासाठी झोप लागली होती. त्यामुळे भुजबळसाहेबांना थांबावे लागेल, असे सांगण्यात आले. ते दीड तास थांबले. तेवढ्याने काही आकाश कोसळलेले नाही. पवारसाहेबांची तब्बेत ठीक नाही, ते आराम करत आहेत, असे समजल्यावर एखादा शहाणा माणूस निरोप ठेवून निघून गेला असता. पण, ते न करता 'महाराष्ट्राच्या स्वास्थाची काळजी' वाहणाऱ्यांनी भेटीसाठी एवढा अट्टाहास करण्याची गरज नव्हती. 
अंगात ताप असतानाही पवारसाहेबांना जाग येताच, त्यांनी भुजबळांना लगेच भेटीला बोलावले, हा पवारसाहेबांचा मोठेपणा... पण,समजा, भेट झालीच नसती तर, त्याचेही राजकारण केले गेले असते. 'ओबीसी नेत्याला पवारसाहेबांनी भेट नाकारली', अशा बातम्या झळकवून दिल्या असत्या. प्रत्येक विषयात राजकारणात घुसवण्याची सवय झालेल्या महाराष्ट्रातील या अशा नेत्यांनीच महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ बिघडवलेले आहे. महाराष्ट्राच्या मुख्य प्रश्नांपासून लक्ष उडवण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. महाराराष्ट्राच्या सामाजिक ऐक्यासाठी आणि सलोख्यासाठी, पवारसाहेबांनी गेली ५०-६० वर्षे किती आटापिटा केला हे महाराष्ट्र जाणतो. 

म्हणून तर मंडल आयोगाच्या अहवालानंतर कसलाही अनुचित प्रकार घडला नाही. एवढ्या मोठ्या नेत्याच्या अंगात ताप असताना अट्टाहासाने भेट घेण्यामागे महाराष्ट्राच्या सामाजिक स्वास्थ्याबद्दलचा उमाळा होता की, उबळ होती. असा प्रश्न पडावा, इतकी भुजबळसाहेबांनी घाई केली. त्याची काही गजर नव्हती. कोणत्या वेळी कसे वागावे, त्याचे काही सुसंस्कृत संकेत आहेत. विठ्ठलाला भक्त म्हणवून घेणारी ही मंडळी, देवाच्या आळंदीतील वाटतील का? पवारसाहेबांना ताप असताना महाराष्ट्राच्या स्वास्थाची चर्चा करायलाच हवी, एवढा काही महाराष्ट्राचा तोल गेलेला नाही. पण, भुजबळसाहेबांचे काहीतरी बिघडले असावे, असे आता जाणवू लागले आहे.
 सध्या एवढेच

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.