Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली, मिरज शासकीय रुग्णालये अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज बनविणार

सांगली, मिरज शासकीय रुग्णालये अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज बनविणार

मिरज, ता. ३० : माणसाला दर्जेदार आरोग्य मिळाव्यात, यासाठी सांगली व मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयास आवश्यक अत्याधुनिक यंत्रसामग्री देऊन आरोग्य सुविधा अधिक बळकट केल्या जातील. या सुविधांसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे दिली.

मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नवीन एमआरआय मशीनचे लोकार्पण व नूतनीकरण केलेल्या 'सीएसएसडी' विभागाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व कामगार तथा पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, नूतन अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हानियोजन अधिकारी अशोक पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे व प्रियांका राठी प्रमुख उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ म्हणाले, खासगी रुग्णालयात ज्याप्रमाणे आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध आहे, त्याचप्रमाणे शासकीय रुग्णालयात आवश्यक यंत्रसामग्री व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. सामान्य माणसाला प्राधान्याने आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनामार्फत शासकीय रुग्णालयांना अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात निधी दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री सुरेश खाडे म्हणाले, कोरोना काळात मिरज रुग्णालयाने चांगले काम केले आहे. या ठिकाणी सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला आहे. मिरज येथील शासकीय रुग्णालयांमधील आवश्यक पायाभूत सुविधांसाठी निधी दिला जाईल.

अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कोरोना काळात रुग्णालयाने चांगले काम केले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या कार्यक्रमात अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व नूतन अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांचे स्वागत करण्यात आले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.