Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी; काय आहे प्रकरण?

मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी; काय आहे प्रकरण?

पुणे: मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्याची माहिती आहे. पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणी जरांगे- पाटील, अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर (सर्व रा.अंबड, जालना) यांच्याविरोधात फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पुण्यातील वारजे भागात राहणाऱ्या धनंजय घोरपडे यांनी फिर्याद दिली होती

या प्रकरणी न्यायालयातील सुनावणीला वारंवार बोलावूनही गैरहजर राहिल्याने जरांगेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. दरम्यान गेल्या चार-पाच दिवसांपासून जरांगेंनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे.

नेमकं प्रकरण काय?

२०१३ मध्ये जालना येथे धनंजय घोरपडे यांच्या 'शंभूराजे' या नाटकाचे सहा प्रयोग मनोज जरांगे पाटील, अर्जुन जाधव व दत्ता बहीर यांनी आयोजित केले होते. प्रत्येक प्रयोगाला पाच लाख रुपये ठरले होते. म्हणजेच ,सहा प्रयोगांचे एकूण तीस लाख रुपये धनंजय घोरपडे यांना देण्याचे आयोजकांनी मान्य केले. पण या प्रयोगांचे पूर्ण पैसे घोरपडेंना न दिल्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेत दाद मागितली. या प्रकरणी घोरपडे यांच्या तक्रारीवरून कोथरूड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान यापूर्वीही न्यायालयात गैरहजर राहिल्याने त्यांना त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते. त्यानंतर जरांगे पाटील मे महिन्याच्या अखेरीस न्यायालयात हजर झाले. तसेच न्यायालयाने जरांगे पाटलांना यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावला आणि पुढील सुनावणीला नियमितपणे हजर राहण्याच्या अटीवर त्यांचे वॉरंटही रद्द केले. पण त्यानंतरही जरांगे नियमितपणे सुनावणीला हजर न राहिल्याने न्यायालयाने त्यांच्याविरोधात पुन्हा अटक वॉरंट काढले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.