Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आता तुमच्या स्वयंपाक घरातील भांड्याबाबत सरकारचा मोठा निर्णय, दिले नवे आदेश

आता तुमच्या स्वयंपाक घरातील भांड्याबाबत सरकारचा मोठा निर्णय, दिले नवे आदेश 


दिल्ली: आपण आपल्या स्वयंपाकघरात दररोज वापरत असलेल्या भांड्यांबाबत सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात सरकारने एक आदेशही जारी केला आहे. स्टील आणि अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यांबाबतचा हा आदेश आहे. भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) भांड्यांची सुरक्षा आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

सरकारच्या या आदेशानंतर स्टेनलेस स्टील आणि अ‍ॅल्युमिनियमची भांडी राष्ट्रीय दर्जाच्या मानकांशी सुसंगत असणं बंधनकारक होणार आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत डीपीआयआयटीने 14 मार्च रोजी क्वालिटी कंट्रोलचा आदेश जारी केला. या आदेशानुसार, आता स्वयंपाकघरातल्या भांड्यांसाठी आयएसआय मार्क बंधनकारक करण्यात आला आहे.

आयएसआय मार्क नसल्यास काय होईल?

बीआयएसने भारतीय मानक संस्थेचा (आयएसआय) लोगो विकसित केला आहे. उत्पादनाची गुणवत्ता आणि सुरक्षितता राखली जाणं हे याचं काम आहे. बीआयएसने दिलेल्या माहितीनुसार, सरकारच्या नवीन आदेशानुसार मानक चिन्ह नसलेल्या कोणत्याही स्टेनलेस स्टील किंवा अ‍ॅल्युमिनियम भांड्यांचं उत्पादन, आयात, विक्री, वितरण, स्टोरेज किंवा विक्री डिस्प्लेवर बंदी घालण्यात आली आहे.
सरकारी आदेशाचं पालन न केल्यास दंड आकारण्यात येणार असल्याचं निवेदनात म्हटलं आहे. हा निर्णय बीआयएसने स्वयंपाकघरातल्या भांड्यांसाठी नुकत्याच तयार केलेल्या मानकांनुसार घेण्यात आला आहे. बीआयएसच्या मानकांनुसार, स्टेनलेस स्टीलसाठी IS 14756:2022 आणि अ‍ॅल्युमिनियम भांड्यांसाठी IS 1660:2024 निश्चित करण्यात आलं आहे.

आपण काय खातो-पितो त्याचा आपल्या आरोग्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतो. जेवण तयार करण्यासाठी योग्य भांडी निवडणंदेखील खूप महत्वाचं आहे. यामधला थोडासा निष्काळजीपणाही आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. आयसीएमआरनेदेखील काही दिवसांपूर्वीच आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये योग्य कुकवेअरबद्दलची माहिती नमूद केली आहे.
या मार्गदर्शक तत्वांनुसार स्वयंपाकासाठी मातीची भांडी, मेटल आणि स्टेनलेस स्टीलचं कुकवेअर, ग्रेनाइटची भांडी सर्वांत सुरक्षित ठरतात. पारंपरिक नॉन-स्टिक भांड्यांपेक्षा ग्रेनाइटची भांडी सुरक्षित आणि अधिक टिकाऊ मानली जातात. याशिवाय, टेफ्लॉन कोटिंगचे नॉन-स्टिक पॅनदेखील वापरण्यास हरकत नाही. ही भांडी कमी फॅटयुक्त जेवण बनवण्यासाठी उपयुक्त ठरतात; पण स्वयंपाक करताना त्यातून विषारी धूर बाहेर पडू नये म्हणून ती जास्त गरम करू नयेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.