Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दारू पिण्याची सवय का लागते? या मागे शास्त्रीय कारण

दारू पिण्याची सवय का लागते? या मागे शास्त्रीय कारण

मुंबई : दारू पिणं ही आजकाल सामान्य गोष्ट झाली आहे. काही जण क्वचित किंवा कधी तरीच दारू पितात, काही जण दर वीकेंडला पार्ट्या करतात, काही जण व्यसनाधीन होऊन जवळपास रोज दारू पितात. दारू पिण्याची प्रत्येकाची सवय वेगवेगळी असली, तरी मुळात दारू पिण्याची इच्छा का होते, हे माहीत आहे का?

विज्ञानाकडे याचं उत्तर आहे.

कोणी आनंद झाला म्हणून दारू पितं, तर कोणी दुःख विसरण्यासाठी दारूचा आधार घेतं. कोणाला थोडी घेतली तरी नशा चढते, तर कोणी बाटलीही रिचवू शकतं. मुळात दारू पिण्याची सवय कशी लागते, तशी इच्छा का निर्माण होते, याबाबत अभ्यास काय सांगतो ते जाणून घेऊ या.

लंडनच्या किंग्ज कॉलेजमधल्या संशोधकांनी प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये (पीएनएएस) एक अभ्यास प्रसिद्ध केला होता. त्यांच्या मते, RASGRF-2 नावाच्या जनुकामुळे व्यक्तीच्या दारू पिण्याच्या भावनेवर परिणाम होतो. हे संशोधन आनुवंशिकता, मेंदूचं रसायनशास्त्र आणि अल्कोहोलशी असलेलं आपलं नातं यावर प्रकाश टाकतं.

या अभ्यासात डोपामाइनवर अधिक भर देण्यात आला आहे. डोपामाइन हा मेंदूमधला आनंद आणि मजा यांच्याशी निगडित एक न्यूरोट्रान्समीटर आहे. आपल्याला चविष्ट जेवण आवडतं किंवा आपल्या पसंतीचं संगीत ऐकायला आवडतं. अशा गोष्टी केल्यावर आपल्या मेंदूतली डोपामाइनची पातळी वाढते. यामुळे समाधान मिळाल्याची जाणीव होते. आपल्याला आनंद देणाऱ्या किंवा मजा वाटणाऱ्या गोष्टींची सवय वाढवण्यास हे कारणीभूत ठरतं.

संशोधकांच्या मते, RASGRF-2 जनुकाचा दारू प्यायल्यावर मेंदूतून डोपामाइन स्रवण्याच्या पद्धतीशी काही संबंध असू शकतो. ज्या व्यक्तींमध्ये हे जनुक असतं, त्यांच्या मेंदूत दारू प्यायल्यानंतर डोपामाइनची पातळी खूप जास्त वाढू शकते. त्यामुळे मजा आली ही भावना वाढते.

लोकांना दारूचं व्यसन का लागतं, हे जाणून घेण्याकरिता संशोधकांनी 14 वर्षांच्या वयाच्या 663 मुलांचा अभ्यास केला. मुलांच्या मेंदूतली व्हेंट्रल सिस्टीम सक्रिय होईल असं काम त्यांनी मुलांना करायला सांगितलं. डोपामाइन स्रवण्यात हा भाग मोलाची भूमिका बजावतो. दोन वर्षांनी मुलं 16 वर्षांची झाल्यावर संशोधक त्यांना पुन्हा भेटले. त्यांच्या दारूच्या सवयींबाबत संशोधकांनी अभ्यास केला. त्यांची निरीक्षणं आश्चर्यकारक होती. ज्या मुलांमध्ये RASGRF-2 हे जनुक होतं, त्यांच्यात दारू पिण्याची सवय इतरांच्या तुलनेत वाढली होती. यावरून RASGRF-2 हे जनुक व दारूमुळे येणारी मजा यातला संबंध अधोरेखित होतो.

दारूचं व्यसन लागण्यामागे केवळ हे जनुकच जबाबदार असं म्हणता येणार नाही. या अभ्यासाचे प्रमुख लेखक प्राध्यापक गुंटर शूमॅन यांच्या मते, इतर काही जनुकं व परिस्थिती यांचाही दारूचं व्यसन लागण्यामागे हात असू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्याचं संगोपन, सामाजिक वर्तुळ आणि दारू पिण्याशी निगडित संस्कृती या गोष्टी दारू पिण्याच्या सवयींवर प्रभाव टाकतात. या अभ्यासाव्यतिरिक्त एका छोट्या गटावरही संशोधन करण्यात आलं. त्या गटाचा आकार पाहता, RASGRF-2 जनुक व दारूची आवड यांच्यात एकच संबंध आहे, अशी धारणा करून घेणं योग्य ठरणार नाही.

या अभ्यासाचा वापर करून भविष्यात अनेकांची दारूची सवय घालवण्यासाठी मदत मिळू शकते. त्या विशिष्ट जनुकाची चाचणी करून ते जनुक असणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवणं शक्य झालं, तर खूप फायदा होऊ शकतो. ज्यांच्यामध्ये दारूचं व्यसन लागण्याचा धोका असेल, त्यांची ओळख पटू शकते व सुरुवातीच्या काळातच दारूची सवय घालवण्यासाठी उपाय करता येऊ शकतात. यामुळे दारूचं व्यसन लागणार नाही. तसंच डोपामाइन स्रवण्यासाठी त्या जनुकाची असलेली भूमिका लक्षात घेतली तर दारूचं व्यसन सोडवण्यासाठी काही नव्या औषधांची निर्मिती केली जाऊ शकते. ही औषधं दारूमुळे नशेचा प्रभाव वाढवणाऱ्या सिस्टीमलाच लक्ष्य करतील. तसंच दारूवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी, माणसांची इच्छा नियंत्रित करण्यासाठी मदत करतील.

जगातल्या अनेक देशांमध्ये दारू पिणं हा संस्कृतीचाच एक भाग असतो; मात्र दारूच्या व्यसनामुळे काही तोटेही होतात. यामुळे आरोग्याचं नुकसान तर होतंच. शिवाय नातेसंबंध बिघडतात. संसार मोडतात, कुटुंबं उद्ध्वस्त होतात. दारूमुळे पती-पत्नींचे संबंध बिघडतात. महिलांना मारहाण होण्याचे प्रकारही याच कारणामुळे होतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, दारू प्यायल्यामुळे 2019मध्ये जगभरात सुमारे 26 लाख जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 4.74 लाख मृत्यू मद्यपानामुळे होणाऱ्या हृदयविकारामुळे झाले आहेत. अगदी कमी प्रमाणात दारू पिणं हेही आरोग्याला हानी पोहोचवण्यासाठी पुरेसं असतं. दारूमुळे यकृत आणि हृदयाचे आजार, तसंच कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना आमंत्रण दिलं जातं. दारूचं व्यसन सोडवण्यासाठी आता काळाबरोबर नवे मार्ग अवलंबले पाहिजेत. त्यामुळे कुटुंबाचं, समाजाचं, देशाचं व पर्यायानं जगाचं नुकसान टळेल. दारूची सवय घालवण्याकरिता नवनवे अभ्यास व संशोधन यांची मदत घेतली पाहिजे. त्यामुळे यात नेमकेपणा येईल व व्यसन सुटण्यास मदत होईल.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.