Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कवठेमहंकाळमध्ये शरद पवार फुंकणार विधानसभेची ' तुतारी '

कवठेमहंकाळमध्ये शरद पवार फुंकणार विधानसभेची  'तुतारी '


नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप महायुतीला जोरदार झटका देत महाविकास आघाडीने मुसंडी मारली. महाविकास आघाडीच्या गटात असणारा उत्साह येणाऱ्या विधानसभेपर्यंत कायम रहावा, या उद्देशाने राष्ट्रवादीकडून शरद पवार पुन्हा एकदा महाराष्ट्र पिंजून काढण्याची तयारी करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून स्व. आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटलांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत शरद पवार यांच्या उपस्थितीत येत्या 8 जुलैला कवठेमहांकाळ येथे मोठा शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस राहिले असताना शरद पवारांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र पिंजून काढण्याचं शिवधनुष्य उचललं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी व महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी राज्यातील सत्ताधारी भाजप महायुतीला घाम फोडला. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर पवारांनी आता आपला मोर्चा विधानसभेकडे वळवला आहे.
तासगाव-कवठेमहांकाळमधून आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनाच यावेळी विधानसभेला संधी देण्यात येईल, असं बोललं जात आहे. त्याच अनुषंगाने रोहित पाटलांच्या वाढदिवसाच्या ‌'टायमिंग' साधत शरद पवारांनी इथे 8 जुलैला तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघासाठी संपूर्ण दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम दिला आहे. याच मेळाव्यातून विधानसभा प्रचाराचा शुभारंभ शरद पवार करणार, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

सोमवारी (8 जुलै) सकाळी शरद पवार यांच्या हस्ते तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर दुपारी कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रसिद्ध आरेवाडी येथील बिरोबा मंदिरात शरद पवार दर्शनासाठी भेट देणार आहेत. यानंतर कवठेमंहाकाळ येथील महांकाली कारखान्याच्या मैदानावर भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी दोन्ही तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची जमवाजमाव करण्याची तयारी सुरू झाली आहे. या मेळाव्याच्या जय्यत तयारीसाठी कार्यकर्त्यांची यंत्रणा कामालाही लागली आहे.

आगामी विधानसभेच्या दृष्टीने या शेतकरी मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून विधानसभेसाठी रोहित पाटील यांच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा शरद पवार याच मेळाव्यात करतील, अशी चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून रोहित पाटील यांची संपूर्ण महाराष्ट्रभर चांगली छाप पडली आहे. स्व. आर. आर. पाटील यांच्यासारखीच देहबोली व भाषण शैली असणाऱ्या रोहित पाटील यांनी आपल्या प्रभावशील भाषणाने सर्वांनाच प्रभावित केले आहे.
आगामी काळात महाराष्ट्रातील राजकारणावर आपला ठसा उमटवण्यासाठी आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. त्याच दृष्टीने शरद पवार यांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले असून कवठेमहांकाळ येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यात राष्ट्रवादीकडून मोठे शक्ती प्रदर्शन होणार आहे.

मोटरसायकल रॅलीने मेळावास्थळी शरद पवारांचे होणार जंगी आगमन..!
कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडीतील बिरोबा देवस्थानचे दर्शन घेऊन शरद पवार हजारो मोटरसायकलच्या रॅलीने कवठेमहांकाळ येथील महांकाली कारखान्याच्या मैदानावर होणाऱ्या शेतकरी मेळाव्यास्थळी दाखल होणार आहेत. या मोटरसायकल रॅलीचीही जय्यत तयारी राष्ट्रवादीकडून सुरू आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.