Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खरंच बिअर प्याल्याने मूतखडा निघून जातो का?

खरंच बिअर प्याल्याने मूतखडा निघून जातो का?


सोशल मीडियावर आरोग्याबाबत अनेक पोस्ट, रील्स व व्हिडिओ फिरत असतात. यात आहार, व्यायाम व आरोग्याच्या अनेक टिप्स दिलेल्या असतात, मात्र त्यात तथ्य किती असतं ते सांगता येत नाही. अशीच एक गोष्ट म्हणजे मुतखड्यावर उपाय म्हणून बिअर प्यावी, पण यात खरोखरच काही तथ्य आहे का?

जीवनशैलीतील बदलांमुळे आजारांचं प्रमाण वाढलंय. मुतखड्याची समस्या अनेकांना उद्भवते. भरपूर पाणी पिणं हा त्यावरचा उपाय सर्वांनाच माहीत आहे, मात्र बिअर प्यायल्यानं मुतखडा लघवीवाटे पडून जातो व दुखणं बरं होतं असा समज समाजात पसरला आहे. त्याला कारणं काहीही असली, तरी यात खरोखरच काही तथ्य आहे हा हे जाणून घेतलं पाहिजे.

मुतखड्याची समस्या ही आता सामान्य बनली आहे. किडनीमधील खड्याचा आकार लहान असेल तर तो लघवीवाटे पडून जातो, मात्र त्याचा आकार मोठा असेल तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. तो काढायला मोठी उपचार पद्धतीही लागते. सर गंगाराम हॉस्पिटलच्या युरॉलॉजी विभागातील सीनिअर कन्सल्टंट डॉक्टर अमरेंद्र पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, किडनीचे दोन भाग असतात. एका भागात रक्त फिल्टर केलं जातं आणि दुसऱ्या भागात लघवी जमा होते. त्या दुसऱ्या भागाला पेल्व्हिस, युरेटर आणि ब्लॅडर असं म्हटलं जातं.
लघवी जेव्हा या भागात साठवली जाऊ लागते, तेव्हा त्यात खडे तयार होण्याची शक्यता वाढते. बहुतेक खडे हे कॅल्शियमचे असतात. ते खडे कसे तयार होतात, हे शोधणं थोडं अवघड असतं. लोकं पाणी कमी पितात आणि प्रथिनयुक्त आहार जास्त घेतात. अशा परिस्थितीत मुतखडा होण्याची शक्यता जास्त असते. ज्यांच्या आहारात कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं, त्यांच्या किडनीमध्ये ते जमा होतं व मुतखडे तयार होतात.

बिअर हा दारूचाच एक प्रकार आहे. बिअर प्यायल्यानं वारंवार लघवी लागते. त्यामुळे त्यातून मुतखडा पडून जात असेल असं अनेकांना वाटतं. मात्र याला कोणताही पुरावा अजून मिळालेला नाही. मुतखड्याचा त्रास असलेल्या व्यक्तीला डॉक्टर कधीही बिअर पिण्याचा सल्ला देत नाहीत. उलट एखाद्या व्यक्तीला मुतखडा असेल व घाईनं लघवीला जावं लागलं, तर किडनी फुगू शकते. अशा परिस्थितीत ही समस्या आणखी गंभीर होऊ शकते. त्यामुळे अशा व्यक्तींना बिअर न पिण्याचा सल्ला दिला जातो.

डॉक्टरांचं निरीक्षण काहीही असलं, तरी समाजात मुतखडा व बिअर याबद्दल झपाट्यानं जनमत पसरतं आहे. प्रिस्टीन नावाच्या एका हेल्थ केअर कंपनीनं केलेल्या सर्वेक्षणात या बाबत एक अजब गोष्ट समोर आली. त्यांच्या मते बिअर प्यायल्यानं मुतखडा बाहेर लघवीवाटे शरीराबाहेर पडून जातो, असं दर तिसऱ्या भारतीयाला वाटतं.
आरोग्याबाबत कोणत्याही गोष्टीची खात्री करून मगच त्यावर विश्वास ठेवणं योग्य ठरतं. विशेषतः काही आजारांबाबत घरगुती उपाय किंवा काही औषधं सांगितली जातात. ती घेण्याआधी खरं तर तज्ज्ञांशी चर्चा करणं जरूरी असतं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.