Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दुचाकी घासल्याच्या वादतून डोक्यात कोयता घालून खून, 4 जणांना अटक

दुचाकी घासल्याच्या वादतून डोक्यात कोयता घालून खून, 4 जणांना अटक 


कागल : करनूर (ता.कागल) येथील गुलाब बाबालाल शेख यांच्यावर कोयत्याने झालेला हल्ला दुचाकी घासून मारल्याच्या कारणावरून झाल्याचे तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कागल पोलिसांनी चार जणांना अटक केली असून दोघांचा शोध घेतला जात आहे.
संशयित आरोपी हे चंदूर, कबनूर येथील आहे. आरोपी मत्तीवडे गावातून शेख मळा रस्तामार्गे जात असताना, त्यांची दुचाकी मृत शेख यांना घासल्याने वाद झाला होता. त्या वादातून शेख यांच्या डोक्यात कोयता मारण्यात आला होता. ही घटना सोमवार दि. ०८ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली होती.
खूनप्रकरणी पर्णोत शिवाजी धनवडे (वय १९ रा.कबनुर), आकाश नरेश कांबळे (वय १९), सौरभ दिनकर जाधव (वय २१), सम्मेद विजय ऐनापुरे (वय १९, तिघे रा.चंदुर ता. हातकणंगले) यांना अटक करण्यात आली असून, फरार असलेल्या आदित्य प्रकाश कांबळे (रा.चंदूर) व सुशांत जरळी (रा.हलकर्णी) यांचा शोध सुरू आहे.

अधिक माहिती अशी, संशयित आरोपी हे दुचाकीवरून मत्तीवडे येथे घोडागाडी शर्यतीला लागणारा घोडा पाहण्यासाठी गेले होते. तेथून परत येत असताना, शेख मळा रस्त्यावर घराकडे चालत चाललेल्या गुलाब शेख यांना आरोपींची दुचाकी घासून गेली. याबद्दल जाब विचारल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यातून एकाने शेख यांच्यावर कोयत्याने वार केले. आधी हातावर वार झाल्याने मनगटाजवळ हात तुटला, तर नंतर डोक्यात वर्मी घाव बसल्याने शेख बेशुद्ध होऊन खाली पडले. त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते. गुरुवारी पहाटे त्यांचे उपचाराच्या दरम्यान रुग्णालयात निधन झाले.
गोपनीय माहितीमुळे आरोपी निष्पन्न

ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली होती. करनूर गावातील काही जण तेव्हा तेथून जात होते. ते घटनास्थळी पोहोचेपर्यंत आरोपी कागलच्या दिशेने पळून गेले होते. यामुळे दोन दुचाकीवरून सहा जण असल्याचे स्पष्ट झाले होते. मत्तीवडे रस्त्याने करनूरमार्गे गेल्याचे समोर आले होते. यावरून पोलिसांनी हा छडा लावला.

आरोपींवर यापूर्वीही गुन्हे दाखल
आरोपींवर पूर्वीही हाणामारी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. यापैकी प्रणोतवर हातकणंगले पोलिस ठाण्यात दोन गुन्हे, आकाशवर एक तर सम्मेदवर दोन गुन्हे दाखल आहेत. कागल पोलिस पुढील तपास करीत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.