फोटोमध्ये निष्पाप दिसणारी ही महिला इतकी धूर्त आहे, की तिने जगातला सर्वांत सुरक्षित देश समजल्या जाणाऱ्या अमेरिकेत लाखो लोकांची फसवणूक केली. एफबीआय तीन वर्षांपासून तिचा शोध घेत असून, तिच्या नावे 42 कोटी रुपयांचं बक्षीस घोषित करण्यात आलं आहे.
रुझा इग्नातोव्हा या बल्गेरियन वंशाच्या जर्मन महिलेने अमेरिकेत दीर्घ काळ वास्तव्य करून गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो लोकांना फसवलं आहे. तिने अवघ्या तीन वर्षांत 33 हजार कोटींचा गंडा घातला आहे. मनी लाँडरिंग आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अमेरिकन पोलीस तिचा शोध घेत आहेत.
एफबीआयच्या माहितीनुसार, रुझा आणि तिचा सहकारी सेबॅस्टियन कार्ल ग्रीनवुड यांनी 2014मध्ये अमेरिकेत सोफिया इथे 'वनकॉइन' नावाचं क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज उघडलं होतं. तिने या क्रिप्टोला क्रांतिकारी गुंतवणूक पर्याय म्हणून प्रोत्साहन दिलं. 2017पर्यंत लाखो लोक या स्कीममध्ये सहभागी झाले आणि त्यांनी सुमारे 33 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. ही स्कीम बनावट असल्याचं नंतर कळलं. तोपर्यंत या महिलेने जगभरातल्या लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक केली होती. वनकॉइनने जगभरातल्या गुंतवणूकदारांना बनावट क्रिप्टोकरन्सी विकल्या. या करन्सीला कोणतंही ब्लॉकचेन किंवा इतर तांत्रिक पाठबळ नव्हतं. गुंतवणूकदारांची दिशाभूल करून त्यांना त्यात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आलं.
इग्नातोव्हा आणि तिचा सहकारी ग्रीनवुड यांनी लोकांची फसवणूक करण्यासाठी Xcoinx.com नावाचं स्वतःचं खासगी एक्स्चेंज तयार केलं. या एक्स्चेंजची रचना अशा प्रकारे करण्यात आली होती, की यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना त्यांचे पैसे लवकर काढण्याचा पर्याय मिळत नाही. गुंतवणूकदारांना त्यांच्या एकूण गुंतवणुकीतला एक छोटासा भाग विकण्याची परवानगी होती. एखाद्या गुंतवणूकदाराने मोठी रक्कम विकण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्या स्क्रीनवर 'अंडर मेंटेनन्स' असा मेसेज दिसत होता.
चेहरा बदलून झाली बेपत्ता
ऑक्टोबर 2017मध्ये इग्नातोव्हा सोफिया सोडून अथेन्सला गेली. त्यानंतर एफबीआयने तिचं नाव टॉप-10 मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत समाविष्ट केलं. तिला 41 कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे; पण अद्याप तिचा शोध लागलेला नाही. असं मानलं जातं आहे, की तिने प्लास्टिक सर्जरी केली आहे.अमेरिकेने वनकॉइन ही जगातली सर्वांत मोठी फ्रॉड स्कीम घोषित केली आणि ती बंद केली. अमेरिका आणि जर्मनीचे पोलीस इग्नातोव्हाचा शोध घेत आहेत. तिचा सहकारी ग्रीनवुड याला 2018मध्ये थायलंडमध्ये अटक करण्यात आली आहे. त्याला 20 वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. याशिवाय 300 दशलक्ष डॉलर्स परत करण्याचा आदेशही देण्यात आला आहे. इग्नातोव्हाचा भाऊ कॉन्स्टँटिन इग्नातोव्हा यालाही मार्च 2019मध्ये अटक करण्यात आली. त्याला 34 महिने तुरुंगवासाची शिक्षा दिली गेली.
खून झाल्याचा संशय
बल्गेरियन माफिया टाकी याने इग्नातोव्हाचा खून केल्याचं समजतं; मात्र या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. एफबीआय सध्या लोकांना इग्नातोव्हाबद्दल माहिती देण्याचं आवाहन करत आहे. त्यासाठी मोठं बक्षीसही देऊ करण्यात आलं आहे. बल्गेरिया सरकारने तिची 1 कोटी युरो म्हणजेच सुमारे 100 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यास मान्यता दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.