सांगली : ऑनलाईन ऑर्डर घेऊन वस्तू पुरवणाऱ्या कंपनीत 'वर्क फ्रॉम होम' नोकरी देतो असे सांगून तरुणीची सव्वा तीन लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत उजमा अनिस मुजावर (वय २०, रा. मुजावर गल्ली, समडोळी) यांनी संशयित चाहत राजपूत व शिरीन (पूर्ण नाव नाही) रा. गुरगाव (हरियाणा) या दोघांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उजमा मुजावर या बी.कॉम. झाल्या आहेत. संशयित महिला चाहत आणि शिरीन या दोघींनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला होता. त्यांना नोकरी डॉट कॉम द्वारे एका नामांकित कंपनीमध्ये 'वर्क फ्रॉम होम' नोकरी देतो असे खोेटे सांगितले. त्यांनी मुजावर यांचा विश्वास संपादन केला. त्यांना नोकरी पूर्वी प्रोसेसिंग फी, लॅपटॉप, डे स्टॉक, ओळखपत्र, कंपनीचे कीट व इतर वस्तू आणि सुरक्षा अनामत अशी कारणे सांगून ऑनलाईन ३ लाख २५ हजार २८० रूपये घेतले. दि. २७ डिसेंबर २०२३ ते ५ जानेवारी २०२४ या दरम्यान हा प्रकार घडला.त्यानंतर मुजावर यांना 'वर्क फ्रॉम होम' ची कोणतीही नोकरीची संधी दिली नाही. त्यांनी विचारणा केल्यानंतर दोघी महिलांनी टाळाटाळ केली. मुजावर यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार दोघींविरुद्ध फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगली ग्रामीण पोलिसांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.