Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कृष्णा, वारणा नदीचे पाणीही सांगलीकरांना मिळणार, 290 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर :आयुक्त शुभम गुप्ता

कृष्णा, वारणा नदीचे पाणीही सांगलीकरांना मिळणार, 290 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर : आयुक्त शुभम गुप्ता 


सांगली : कृष्णा नदीच्या प्रदूषणाला जबाबदार असलेल्या शेरीनाल्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. त्याचबरोबर वारणा नदीतूनपाणी उचलून सांगली, कुपवाडला देण्यासाठी २९० कोटी रुपयांची योजनाही महापालिका हाती घेईल, अशी माहिती आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, शेरीनाला प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी ९४ कोटींचा प्रकल्प महापालिका हाती घेणार असून या प्रकल्पातून जलशुद्धीकरण करून उपलब्ध होणारे पाणी शेतीसाठी देण्यात येईल. महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या तीन मुख्य समस्या समोर आहेत. शुद्ध पाणी, जलनिस्सारण सुविधा आणि वीज या मूलभूत प्रश्नाकडेच प्रशासनाचे प्रामुख्याने लक्ष आहे.
सांगली, मिरज व कुपवाड या तीनही शहरात जलनिस्सारणच्या प्रश्नाकडे यापूर्वी दुर्लक्ष झाले असले तरी प्राधान्याने हे प्रश्न कायमचे निकाली काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी दर पंधरा दिवसांनी संबंधित विभागाच्या बैठका घेऊन आढावा घेण्यात येईल. ड्रेनेज प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी ३१ डिसेंबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.
जलनिस्सारणमध्ये भूसंपादनाचा मुख्य अडसर होता, तोही संपुष्टात येण्याच्या मार्गावर असून येत्या काही दिवसांत तो निकाली निघेल यात शंका नाही. यामुळे तीनही शहरातील ड्रेनेजची समस्या डिसेंबरअखेर निकाली निघालेली दिसेल.

असे रोखणार नदीचे प्रदूषण
शेरीनाल्याचा ९४ कोटींचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पानुसार अस्वच्छ पाणी एकत्रित करून ते शुद्ध करून शेतीसाठी वापराचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे शेतीला पाणी तर मिळेलच, पण या माध्यमातून महापालिकेला उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे. तसेच शेरीनाल्याचे दूषित पाणी कृष्णा नदीत मिसळल्याने होणारे नदीचे प्रदूषण रोखले जाणार आहे.
वारणा उद्भवसाठी पाठपुरावा

भविष्यातील लोकसंख्या गृहित धरून पिण्याच्या पाण्यासाठी वारणाउद्भव योजना हाती घेण्यात येणार असून यासाठी २९० कोटींचा प्रकल्प अहवाल शासन मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. अमृत योजनेतून ही योजना हाती घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

एलईडी दिव्यांच्या तक्रारी सोडवू
शहरातील दिवाबत्तीसाठी एलईडी प्रकल्पाची सातत्याने तपासणी करण्यात येत आहे. नागरिकांनाही शहरात कुठे दिवाबत्तीची सोय करणे आवश्यक आहे, हे कळावे यासाठी सांगलीत दोन तर मिरज व कुपवाडमध्ये प्रत्येकी एक अशा एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. सध्या दिवाबत्तीची तक्रार आल्यास ४८ तासांत दुरुस्ती केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.