तब्बल दीड तास वाट पाहून छगन भुजबळ यांना आत घेतलं पण अवघ्या 15 मिनिटात बाहेर पडले,नेमकं काय घडलं सिल्व्हर ओकवर
मुंबई: अजितदादा गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे सोमवारी सकाळी अचानकपणे सिल्व्हर ओकवर शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. शरद पवार यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे छगन भुजबळ यांना त्यांच्या भेटीसाठी तब्बल दीड तास वाट पाहावी लागली. पण छगन भुजबळ हे पवारांची भेट घेतल्याशिवाय माघारी जायचे नाही, या पवित्र्यात होते. अखेर दीड तासाभरानंतर शरद पवार यांनी भुजबळ यांना आतमध्ये बोलावले.
त्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत या दोन्ही नेत्यांची चर्चा आटोपली. माझे काही पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत, त्यासाठी मला निघायचे आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्या कारणासाठी इथे आला आहात, असे शरद पवार यांनी भुजबळ यांना विचारल्याचे समजते. यावर छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
काहीवेळापूर्वीच शरद पवार यांची भेट आटोपून छगन भुजबळ सिल्व्हर ओकवरुन माघारी परतले आहेत. सिल्व्हर ओकवरुन बाहेर पडताना छगन भुजबळ प्रसारमाध्यमांशी काहीच बोलले नाहीत. आता ते आणखी काही वेळाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधून या भेटीविषयी नेमकं काय सांगणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे. आता छगन भुजबळ यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन काही बोलणार का, हे पाहावे लागेल.
छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्यातील भेटीविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाच कल्पना नसल्याची माहितीही समोर आली आहे. छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. कोणालाही भेटण्यासाठी त्यांना माझ्या परवानगीची गरज नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. त्यामुळे छगन भुजबळ नेमक्या कोणत्या कारणासाठी शरद पवार यांना भेटले होते, याविषयीची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
बारामतीच्या सभेतलं 'ते' वक्तव्य शरद पवारांच्या वर्मी लागलं अन् भुजबळ सिल्व्हर ओकवर गेले?
छगन भुजबळ यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती येथील मेळाव्यात शरद पवार यांच्यावर टीका केली होती. मराठा-ओबीसी आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित केलेल्या बैठकीला विरोधी पक्षाचे नेते येणार होते. मात्र, दुपारी पाच वाजता त्यांना बारामतीहून कोणाचा तरी फोन आला आणि विरोधी पक्ष बैठकीला आले नाहीत, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्याचा रोख शरद पवार यांच्या दिशेने होता. भुजबळांच्या या वक्तव्यावर शरद पवार प्रचंड नाराज असल्याचे समजते. त्यांनी भुजबळांना आपली नाराजी स्पष्टपणे सांगितली असावी. त्यामुळे छगन भुजबळ इतक्या तातडीने सिल्व्हर ओकवर गेले असावेत, असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.