Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गडचिरोली पोलिसांची मोठी कामगिरी :, चकमकीत 12 नक्षलवादी ठार

गडचिरोली पोलिसांची मोठी कामगिरी :, चकमकीत 12 नक्षलवादी ठार 


महाराष्ट्र - छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत 12 माओवादी ठार झाले असून घटनास्थळावरून पोलिसांनी स्वयंचलित शस्त्रे जप्त केली आहेत. या यशस्वी कारवाईबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलिसांचे विशेष अभिनंदन केले आहे.

बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी (ऑपरेशन्स) यांच्या नेतृत्वाखाली 7 सी 60 पथकांनी विशेष ऑपरेशन सुरू केले. वांडोली गावाजवळ 12-15 नक्षलवादी तळ ठोकून असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. या कारवाईदरम्यान सुमारे 6 तासांहून अधिक काळ गोळीबार सुरू होता. गडचिरोली पोलिसांनी केलेल्या या कारवाईत 12 माओवादी ठार झाले आहेत. यावेळी तीन एके ४७, २ INSAS, १ कार्बाइन आणि १ एसेलआर अशी ७ स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलिसांनी केलेल्या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक, पोलिस उपमहानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र), पोलिस महानिरीक्षक (नक्षल विरोधी अभियान) आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी सर्व सहभागी जवानांच्या शौर्याचे कौतुक करून त्यांनाही शुभेच्छा दिल्या.

"ही कारवाई गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी हालचालींवर निर्णायक आघात ठरणारी असून विकासाला प्राधान्य देऊन हिंसाचाराला ठाम विरोध करणे, असे आमचे धोरण असल्याचे'' मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. गडचिरोली जिल्हा संपूर्णपणे नक्षलमुक्त करण्याचा आमचा निर्धार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. पोलिस दलाच्या या अतुलनीय कामगिरीमुळे परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम होणार असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढण्यास मदत होणार असल्याचंही त्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईत सहभागी असलेल्या जवानांना 51 लाख रुपयांच्या विशेष बक्षिसाची घोषणा केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.