बांगलादेशात आरक्षणाविरोधातील हिंसाचारात 105 जणांचा मृत्यू : संपूर्ण देशात संचारबंदी, 978 भारतीय परत आणले
ढाका: बांगलादेशात आरक्षणविरोधी आंदोलन सुरूच असून सरकारने देशभर संचारबंदी लागू केली आहे. सरकारने पुढील सूचना मिळेपर्यंत देशभरातील सर्व शिक्षण संस्था आणि विद्यापीठे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच सर्व सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नाकारली गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या हिंसक आंदोलनांमध्ये मरण पावलेल्यांची संख्या 105 च्या पुढे गेली आहे. तरीही अजूनही तेथील हिंसाचाराचे प्रमाण आटोक्यात आलेले नाही.शुक्रवारी देशाच्या विविध भागात आणखीन काही जण हिंसाचारात मरण पावल्याचे वृत्त आहे. मात्र ठार झालेल्यांच्या आकड्यांमध्ये तफावत आढळते आहे. एका वृत्तवाहिनीने ४३ तर असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेच्या वृत्तात २३ जण ठार झाल्याचे म्हटले आहे. ठार झालेले सर्व शुक्रवारच्या हिंसाचचारात ठार झाले का, हे देखील निश्चित समजू शकलेले नाही.
गुरुवारी आंदोलक विद्यार्थ्यांनी देशभर बंद लागू करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी २२ जण ठार झाले होते. मंगळवारी आणि बुधवारी देखील काही जण ठार झाले होते. गेल्या आठवड्यापासून धुमसत असलेल्या या आंदोलनाचा भडका मंगळवारी उडाला होता. सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या विरोधासाठीचे हे आंदोलन आटोक्यात आणण्याचे मोठा आव्हान सध्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यापुढे आहे.
हिंसाचार रोखण्यासाठी प्रसासनाने देशभरातील इंटरनेट सेवा स्थगित केली आहे. काही वृत्तवाहिन्यांची सेवा देखील थांबवली गेली आहे. तर बांगलादेशातील बहुतेक वर्तमानपत्रांच्या संकेतस्थळांवर नवीन मजकूर अपलोड केला जात नाही आहे. मृतांचा नेमक्या आकड्याची प्रशासनाकडून खातरजमा केली जाऊ शकत नाही आहे. केवळ परिस्थिती अत्यंत अस्थिर असल्याचे सांगितले जाते आहे.प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅसनलिस्ट पार्टीने देखील स्वतंत्रपणे निदर्शनांचे आयोजन केले आहे. बीएनपीचे कार्यकर्ते विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सामील झाले आहेत. सत्तारुढ आवामी लीग आणी बीएनपीने सातत्याने एकमेकांवर राजकीय अराजकता माजवण्याचे आरोप केले आहेत.सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण बहाल करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे सरचिटणीस ओबेदुल कादर यांनी शुक्रवारी (19 जुलै) उशिरा कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली. हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी लष्कर तैनात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.शुक्रवारी पोलिस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आंदोलकांवर गोळीबार केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार आतापर्यंत एकूण 105 लोकांचा मृत्यू झाला आहे. बांगलादेशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ९७८ भारतीय विद्यार्थी त्यांच्या घरी परतले आहेत. ढाका विद्यापीठ पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना बुधवारपर्यंत वसतिगृह रिकामे करण्यास सांगण्यात आले आहे.
न्यूज एजन्सी एएफपीच्या वृत्तानुसार, निषेधार्थ विद्यार्थ्यांनी शुक्रवारी नरसिंगडी जिल्ह्यातील तुरुंगावर हल्ला केला होता. कारागृहातून शेकडो कैद्यांची सुटका केल्यानंतर त्यांनी ते पेटवून दिले. याआधी गुरुवारी शेकडो आंदोलकांनी बीटीव्ही कार्यालयाच्या परिसरात घुसून 60 हून अधिक वाहने जाळली. त्याच दिवशी पंतप्रधान शेख हसीना यांनी बीटीव्हीला मुलाखत दिली.
दिसताक्षणी गोळ्या झाडण्याचे आदेश
मध्यरात्रपासून लागू झालेली संचारबंदी दुपारी १२ वाजल्यापासून २ वाजेपर्यंत शिथील केली गेली. रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत पुन्हा ही संचारबंदी लागू असणार आहे. समाजकंटकांवर दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत.
चर्चेद्वारे तोडगा काढण्याचे प्रयत्न
आरक्षणाला विरोध करणाऱ्या विद्यार्थी संघटना आणि सरकारचे समर्थन असलेल्या संघटनांमध्ये सामोपचाराने चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न शुक्रवारी झाले. या चर्चेसाठी दोन्ही बाजूंचे ३ प्रतिनिधी उपस्थित होते. कोटा पद्धतीमध्ये दुरुस्ती केली जावी, विद्यार्थ्यांच वसतीगृहे सुरू करण्यात यावीत आणि विद्यापीठांच्या आवारामध्ये घुसखोरी करू देणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ केले जावे, अशा मागण्या विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी केल्या.
बांगलादेशातील आरक्षणाबाबत निषेधाचे कारण
1971 मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाला. बांगलादेशी वृत्तपत्र डेली स्टारच्या वृत्तानुसार, या वर्षापासून तेथे 80 टक्के कोटा प्रणाली लागू करण्यात आली होती. यामध्ये स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना नोकऱ्यांमध्ये ३० टक्के, मागासलेल्या जिल्ह्यांना ४० टक्के आणि महिलांना १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी फक्त २० टक्के जागा ठेवण्यात आल्या होत्या.
1976 मध्ये मागासलेल्या जिल्ह्यांसाठी 20% आरक्षण वाढवण्यात आले. यामुळे सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी 40% जागा राहिल्या. 1985 मध्ये, मागास जिल्ह्यांसाठी आरक्षण आणखी कमी करून 10% करण्यात आले आणि अल्पसंख्याकांसाठी 5% कोटा जोडण्यात आला. त्यामुळे सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी ४५ टक्के जागा शिल्लक राहिल्या. सुरुवातीला फक्त स्वातंत्र्यसैनिकांच्या मुला-मुलींनाच आरक्षण मिळायचे, पण 2009 पासून नातवंडांचाही त्यात समावेश करण्यात आला. 2012 अपंग विद्यार्थ्यांसाठी 1% कोटा देखील जोडला गेला. यामुळे एकूण कोटा 56% झाला.
978 भारतीय विद्यार्थी त्यांच्या घरी परतले
बांगलादेशातून आतापर्यंत 978 भारतीय विद्यार्थी परतले आहेत. मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनी शुक्रवारी सांगितले की, भारतीय विद्यार्थ्यांना बांगलादेशातून डोकी एकात्मिक चेक पोस्टद्वारे बाहेर काढण्यात आले आहे. त्यापैकी सुमारे 80 मेघालयातील आहेत आणि उर्वरित इतर राज्यांतील आहेत. नेपाळ आणि भूतानमधील काही विद्यार्थी आणि पर्यटकांनाही बाहेर काढण्यात आले आहे.मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, बांगलादेशच्या ईस्टर्न मेडिकल कॉलेजमध्ये सुमारे 36 विद्यार्थी अडकले आहेत. आम्ही तेथील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. कॉलेज आणि परिसराची स्थिती ठीक आहे. मात्र, तेथील परिस्थिती पाहून विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत आहेत.भारत सरकारला मार्ग स्पष्ट आणि सुरक्षित असल्याची पूर्ण खात्री होईपर्यंत परिस्थितीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतरच या विद्यार्थ्यांना भारतात आणले जाईल. बांगलादेशात एकूण भारतीय नागरिकांची संख्या सुमारे 15,000 आहे, ज्यामध्ये सुमारे 8,500 विद्यार्थी आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.