Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ऑगस्टमध्ये 10,000 शिक्षकांची भरती! ZP तील 3,500 तर खाजगी शाळामधील 6,500 पदांचा समावेश

ऑगस्टमध्ये 10,000 शिक्षकांची भरती! ZP तील 3,500 तर खाजगी  शाळामधील 6,500 पदांचा समावेश 


पूर्वी जाहीर केलेली शिक्षक भरती सध्या सुरू आहे. जुलैअखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमधील रिक्त ३० टक्के पदांपैकी १० टक्के पदभरतीच्या जाहिराती शिक्षणाधिकाऱ्यांना पवित्र पोर्टलवर अपलोड करता येणार आहेत. दुसरीकडे खासगी अनुदानित संस्थांना देखील या भरतीत सहभागी होता येणार आहे. जिल्हा परिषदांमधील साडेतीन हजार तर खासगी संस्थांमधील सहा ते साडेसहा हजार पदे देखील त्यावेळी भरली जाणार आहेत.

राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मागील दहा वर्षांतील सर्वात मोठी शिक्षक भरती करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. त्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमधील २२ हजार पदांचा समावेश आहे. दरम्यान, शासनाच्या निर्णयानुसार २० टक्के पदे रिक्तच राहतील, पण बिंदूनामावलीतील 'एनटी-सी' प्रवर्गाच्या आक्षेपामुळे १० टक्के पदे रिक्त ठेवण्यात आली होती.

आता ती पदे ऑगस्टमध्ये भरली जाणार आहेत. यावेळी ज्या खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांना मागच्यावेळी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात अपलोड करता आली नाही, त्यांनाही संधी मिळणार आहे. याशिवाय बिंदूनामावली अपूर्ण असल्याने ज्या महापालिका, नगरपालिकांना त्यांच्या शाळांमधील शिक्षक भरण्याची जाहिरात अपलोड करता आली नाही, त्यांनाही त्यावेळी रिक्त पदांवर शिक्षक मिळणार आहेत.
शिक्षक भरतीपूर्व 'टीईटी' ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये

शिक्षक होण्यासाठी डीएड-बीएड उत्तीर्ण उमेदवारांना टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) पास व्हावी लागते. त्यानंतर बीएडधारक उमेदवारांना नोकरीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून 'टीईटी' घेण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासंबंधीची निविदा काढण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये 'टीईटी' घेतली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. त्यानंतर तीन-चार महिन्यांनी 'टीएआयटी' होईल, असेही ते म्हणाले.

खासगी संस्थांना 'पवित्र'वरूनच उमेदवार
खासगी अनुदानित संस्थांच्या मनमानीला आवर घालत आता त्यांची शिक्षक भरती देखील पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच होत आहे. एका रिक्त पदासाठी दहा उमेदवार त्या संस्थेत पाठविले जातात. मुलाखतीच्या माध्यमातून त्या दहापैकी एका उमेदवाराची शिक्षक म्हणून निवड करता येईल. त्या दहा उमेदवारांशिवाय अन्य दुसरा उमेदवार शिक्षक म्हणून संस्थेला घेताच येत नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.