खानापूर तालुक्यातील रेणावी हद्दीत ऊस आणि इतर पिकात आंतरपीक म्हणून लावलेली जवळपास शंभर किलो गांजाची झाडे पोलिसांनी आढळून आली. याची किंमत १० लाख ७ हजार रूपये इतकी असून अंदाजे ३ ते ५ फुट उंचीची गांजाची २४० झाडे विटा पोलिसांनी जप्त केली आहेत. या प्रकरणी संशयित राजाराम आनंदा गुजले (रा. रेणावी) यांस अटक केली आहे.
याबाबत विट्याचे पोलिस निरीक्षक शरद मेमाने म्हणाले, रेणावी गावात गांजाची शेती असल्याबाबतची माहिती विटा पोलिस ठाण्याचे हवालदार किरण खाडे आणि उत्तम माळी यांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी पोलीस पथकासह संबंधीत ठिकाणी छापा टाकला. यावेळी संशयीत राजाराम आनंदा गुजले (५० वर्षे, रा. रेणावी ता. खानापुर जि. सांगली) याने त्याच्या ऊस आणि इतर पिकामध्ये गांजाची लागवड केली असल्याचे आढळून आले.
संशयीत गुजले याला ताब्यात घेवून शेतीची पाहणी केली. यावेळी शेतातील ऊसामध्ये व इतर शेतीमध्ये एकूण लहान मोठी २४० गांजाची झाडे आढळून आली. त्याचे एकूण वजन १०० किलो ७०० ग्रॅम असून सुमारे १० लाख ७ हजार रूपये किंमतीचा हा मुद्देमाल असल्याचे पोलिस निरीक्षक मेमाने यांनी सांगितले. संबंधीत झाडे जप्त करुन आरोपीला ताब्यात घेतले आहे. सुमारे अर्धा एकर क्षेत्रावर ही झाडे लावली होती. रेणावी ते वासुंबे या दरम्यान असणाऱ्या पठारावर ऊसाच्या शेतात ही झाडे लावली होती. या भागात वर्दळ कमी असल्याने कोणाचेही तिकडे लक्ष जात नाही. मात्र आमच्या लोकांकडून टीप मिळाली. त्यामुळे ही शेती उघडकीस आली, असे पोलिस निरीक्षक मेमाने यांनी सांगितले.दरम्यान पोलिस निरीक्षक शरद मेमाणे म्हणाले, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप घुगे यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येत आहे. अंमली पदार्थ बाळगणे गुन्हा असून याबाबत माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.